For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्षिणेत भाजप पुन्हा किमया घडवेल?

06:45 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
दक्षिणेत भाजप पुन्हा किमया घडवेल
Advertisement

विधानसभा निवडणुकीत हरलेल्या नेत्यांना खासदारकीसाठी उभे करणे, ही गोव्याच्या राजकीय पक्षांची परंपरा. अपवाद सोडल्यास आजपर्यंत असेच घडत आलेले आहे. भाजपने मात्र यंदा नवा प्रयोग केला. राजकारणात धनलक्ष्मीची पावले उमटली आहेत. व्यवहारात धनलक्ष्मी श्रेष्ठ ठरत असली तरी निवडणुकीच्या राजकारणात जनता-जनार्दनाचा निर्णय श्रेष्ठ ठरतो, हे नाकारता येत नाही. भाजपला राजकारणाबाहेरील चेहरा देणे शक्य झाले तर इतर राजकीय पक्षांना हे का जमत नाही, हा प्रश्न आहे. राजकारणाबाहेरील सरस्वती आणि लक्ष्मीचे वरदान लाभलेली एखादी सन्माननिय व्यक्ती काँग्रेसला का सापडू शकत नाही. लोकसभेच्या उमेदवारीसाठी धडपडणारे सारेच नेते वेळोवेळी जनतेने नाकारलेलेच आहेत, हे लक्षात असावे. भाजपने उद्योगपतींना निवडणूक रिंगणात आणल्याने यंदाच्या निवडणुकीचे हे वैशिष्ट्या ठरले आहे.

Advertisement

तशी यंदाची निवडणूक वैशिष्ट्यांनीच भरलेली आहे. कसलाही करिष्मा नसलेले श्रीपाद नाईक सहाव्यांदा विजयी होऊन गोव्यात विक्रम करण्याचे ध्येय बाळगून आहेत. दक्षिण गोव्यात प्रथमच एक उद्योगपती महिला उमेदवार राजकीय पक्षाने बहाल केलेली आहे. काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रथमच लागलेली चढाओढ गोव्यात काँग्रेसचे भवितव्यच ठरवणारी ठरलेली आहे. माजी केंद्रीय कायदामंत्री आणि एकेकाळचे राजकारणातील अनभिषिक्त सम्राट रमाकांत खलप यांची फार मोठ्या सक्तीच्या विश्रांतीनंतर उमेदवारीसाठी छोट्या नेत्यांबरोबर लागलेली स्पर्धा हेसुध्दा या निवडणुकीतले वैशिष्ट्याच आहे. येणाऱ्या काही दिवसांत बहुदा गोवेकरांना अनेक वैशिष्ट्यो किंवा आश्चर्ये पाहावी लागतील.

Advertisement

आज-उद्या करीत अखेर भाजपने गोव्यातील दोन जागांवरील उमेदवारीचा घोळ संपविला आणि ते प्रचारालाही लागले. दक्षिण गोव्याला तर भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी धक्काच दिला. धक्कातंत्रात भाजपचा हात धरणारे कुणी नाही, हे पुन्हा एकदा सिध्द झाले. काँग्रेस मात्र निवडणूक दारावर आली तरी उमेदवारीच्या चढाओढीला तोंड देत राहिली. गोव्यात काँग्रेसचे नेते निवडून येतात आणि भाजपच्या गोटात सामील होतात. त्यामुळेच या पक्षाला सद्यस्थितीत वाईट दिवस आलेले आहेत. येणाऱ्या संकटाची चाहूल लागल्याने ‘आप’ने देशपातळीवर काँग्रेसला साथ दिली. गोव्यातील काँग्रेसने ‘आप’चे उपकारच मानायला हवेत. तरीसुध्दा भाजप जोमात आणि काँग्रेस कोमात अशीच स्थिती आहे. गोव्यात भाजपविरोधी मतदारांना मनासारखा पर्याय सापडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेस संघटित राहिल्यास भाजपला आव्हान देऊ शकते. दक्षिण गोवा तर काँग्रेसचा बालेकिल्लाच आहे मात्र गर्भगळीत काँग्रेसला भाजपचे आव्हान पेलेल का? हा प्रश्न उपस्थित होतोच. एकीकडे गोव्यातील काँग्रेसची केविलवाणी स्थिती आणि दुसरीकडे भाजपची भरारी घेणारी घोडदौड पाहता, काँग्रेसवाल्यांच्या मनात दडलंय तरी काय, असा संशय उपस्थित झाल्यावाचून राहात नाही.

तसे पाहता गोव्यातील राजकीय पक्षांना विधानसभेच्या पडेल उमेदवाराला लोकसभेवर पाठविणे योग्य वाटत आलेले आहे. फ्रान्सिस सार्दिन खासदार बनले, विधानसभा निवडणुकीत पडल्यामुळेच. पंचवीस वर्षांपूर्वी श्रीपाद नाईकांनाही त्याच कारणामुळे खासदार बनावे लागले होते. कधीकाळी प्रा. गोपाळराव मयेकर, हरिष झांटये, अॅड. रमाकांत खलप, रवी नाईक, चर्चिल आलेमाव हे नेतेसुध्दा विधानसभा निवडणुकीत पडल्यानंतरच खासदार बनले होते. ही मंडळी तशी केंद्रात रमलीही नाही. अगदी मनोहर पर्रीकरांनाही मुख्यमंत्रीपद सोडून दिल्लीत जावे लागत असल्याची खंत होतीच. दिल्लीत प्रधान बनण्यापेक्षा आपल्या राज्यात राजा बनणे, गोव्यातील नेत्यांना आवडते. दिल्लीत रमले ते फक्त एदुआर्द फालेरो. गोव्यातील ते पहिले केंद्रीयमंत्री होते. अॅड. नरेंद्र सावईकरांनी विधानसभेच्या वाटेला न जाता खासदार बनण्याचे ध्येय पूर्ण केले. इतरांना खासदार बनण्यापेक्षा स्थानिक राजकारणात आमदार-मंत्री बनणेच सोयीचे वाटत आले आहे. चर्चिल आलेमाव तर खासदारकीचा राजीनामा देऊन विधानसभेच्या रिंगणात उतरले होते. गोव्याच्या बहुतेक खासदारांचा असाच इतिहास आहे. यंदाही काही वेगळे घडत नाही. दक्षिण गोव्यात भाजपच्या पडेल उमेदवारांनीच खासदारकीसाठी उत्सुकता दाखविली. काँग्रेसचेही तेच आहे. आमदार बनण्याची क्षमता नसलेले किंबहुना विधानसभा निवडणुकीत पडलेले उमेदवारच खासदार बनू पाहात असल्याचे दिसते. पडेल उमेदवारांची खासदारकीच्या उमेदवारीसाठी चाललेली स्पर्धा यंदा अधिकच रंगात आलेली आहे. भाजपच्या उत्तर गोव्याच्या उमेदवारीसाठी असेच काही पडेल उमेदवार जागे झाले होते मात्र भाजपने श्रीपाद नाईक यांच्यावरच शिक्कामोर्तब करून या स्पर्धेला बगल दिली. दक्षिण गोव्याची परिस्थिती फार चलाखीनेच हाताळली. धनलक्ष्मीला वाट मोकळी करून दिली आणि साऱ्यांनाच कामाला लावले.

दक्षिण गोव्यात भाजपने एकाच दगडात अनेक पक्षी मारले. राजकारणाचे कधी तोंड न पाहिलेल्या पल्लवी धेंपेला उमेदवारी बहाल केली. मनोहर पर्रीकरांच्या काळात गोव्यातील भाजपमध्ये ‘मी करीन तीच पूर्व’ अशी स्थिती होती. आता भाजपवर केंद्राचा अंमल आहे. उठसूठ दिल्लीला धाव घ्यावी लागते. पल्लवी धेंपे ही थेट दिल्लीचीच निवड. धेंपे हे वादातीत घराणे. धेंपो उद्योग समूह आणि धेंपे घराण्याकडे गोव्यात आदराने पाहिले जाते. उद्योगाबरोबरच या घराण्याचे सामाजिक योगदानही मोठे आहे. त्यांचे समाजकार्य खानदानी आहे, वर्तमानपत्रात फोटो छापून आणण्यासाठी नाही. या घराण्याचा सन्मान, योगदान आणि क्षमता पाहूनच पल्लवी धेंपेंची भाजपने निवड केली असावी, असे म्हणण्यास हरकत नाही. भविष्यात त्यांना राजकारणातले गहिरे रंगही उमजून येतील. तूर्त भाजप नेते पल्लवी धेंपेची निवड सार्थ ठरविण्यासाठी झपाटलेले आहेत. स्वत:च्या राजकीय भवितव्यासाठी नेत्यांना दक्षिण गोव्याची जागा भाजपला जिंकून द्यावीच लागणार आहे. वीस मतदारसंघात भाजपच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे. घरात आलेली लक्ष्मी निराश होऊ नये, याची खबरदारी घ्यावीच लागेल. सध्या भाजपचे धन ऊतू जात आहे. काँग्रेसचे धन मात्र सीलबंद झालेले आहे. व्यवहारात धनलक्ष्मी श्रेष्ठ असली तरी निवडणुकीच्या राजकारणात जनलक्ष्मीच श्रेष्ठ असते, हे नाकारता येणार नाही.

अनिलकुमार शिंदे

Advertisement
Tags :

.