For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘त्यांच्या’ राज्यात हनुमान चालिसाही गुन्हा

06:23 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘त्यांच्या’ राज्यात हनुमान चालिसाही गुन्हा
Advertisement

काँग्रेसच्या राज्यात हनुमान चालिसा ऐकणेही गुन्हा आहे. कर्नाटकात अशी स्थिती आहे. ही या पक्षाची मानसिकता आहे, म्हणूनच त्या पक्षाचा सातत्याने पराभव होत आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील टोंक-सवाई माधोपूर लोकसभा मतदारसंघातील प्रचार सभेत भाषण करताना केला. मंगळवारी संपूर्ण देश हनुमानजयंतीचा सण साजरा करत असताना ते औचित्य साधून त्यांनी काँग्रेस पक्षाच्या छद्मधर्मनिरपेक्षतेच्या विचारसरणीला लक्ष्य केले.

Advertisement

काँग्रेसची नियत विशिष्ट समाजघटकांचे लांगूलचालन करणे आणि अन्य समाजघटकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे अशी आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात संपत्तीच्या पुनर्वाटपाचे आश्वासन देण्यात आले आहे. हे पुनर्वाटप भारतात घुसखोरी करुन आलेल्या लोकांनाच केले जाण्याची शक्यता आहे. ही शक्यता मी माझ्या एका प्रचार भाषणात व्यक्त करताच काँग्रेसला मिरची झोंबली. त्यामुळे आता या पक्षाच्या नेत्यांनी आरडाओरड सुरु केली आहे, अशीही टीका त्यांनी केली.

हनुमान चालिसा लावल्याने मारहाण

Advertisement

कर्नाटकात काँग्रेसचे राज्य आहे. तेथे एका व्यक्तीला आपल्या दुकानात हनुमान चालिसा लावल्यामुळे विशिष्ट लोकांकडून मारहाण करण्यात आली. अशी स्थिती अशा राज्यातच असू शकते. सर्व राज्यांमधील लोकांनी याचा विचार केला पाहिजे. राजस्थानातही काँग्रेसचे राज्य असताना, रामनवमीच्या दिवशी दंगल घडविण्यात आली होती. बहुसंख्य समाजाला त्याचे सण आनंदाने साजरे करतानाही त्रास होईल, अशी व्यवस्था राजस्थानात होती. रामनवमी साजरी करण्यावरही बंदी होती. त्यामुळे संतप्त मतदारांनी ते राज्य उखडले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही या पक्षाची अशीच दुर्दशा होणार आहे, अशा अर्थाचे प्रतिपादन त्यांनी केले.

काँग्रेसचा गुप्त कार्यक्रम उघड

लोभसवाणी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा आणि आपला गुप्त कार्यक्रम नंतर जनतेवर लादण्याचा काँग्रेसचा विचार आहे. तो मी उघडा पाडल्याने काँग्रेसच्या नेत्यांचा तीळपापड झाला आहे. त्यामुळे त्यांनी आता माझ्या नावाने अपशब्दांची लाखोली वाहण्यास प्रारंभ केला आहे. काँग्रेसने तिची ध्येयधोरणे आणि कार्यक्रम उघडपणे जनतेसमोर मांडावेत. पण हे कार्यक्रम गुप्त ठेवण्यातच या पक्षाला रस आहे आणि ते उघड केल्यास लोक मते देणार नाहीत, असे भय या पक्षाला वाटते. सर्वांच्या संपत्तीचे सर्वेक्षण करण्याची घातक योजना काँग्रेसने तयार केली आहे. ती बाहेर आणण्यात आल्याने हा पक्ष बिथरला आहे. तथापि, मतदार समंजस असून असे गुप्त कार्यक्रम असणाऱ्या पक्षाचा पराभव केल्याशिवाय तो राहणार नाही, अशी स्पष्टोक्ती करतानाच त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.