तौक्ते पाठोपाठ पूर्व सागरतटावर वादळ
26 मे च्या आसपास पश्चिम बंगाल, ओडिशाला धोका
कोलकाता / वृत्तसंस्था
भारताच्या पश्चिम सागरतटाला तौक्ते वादळाने तडाखा दिल्यानंतर आता पूर्वेकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशाला धोका निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्टय़ाचे वादळात रुपांतर होत असून त्याचे नाव ‘याश’ असे ठेवण्यात आले आहे.
24 आणि 25 मे या दिवसांमध्ये या दोन राज्याच्या सागरतटीय भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 26 मे या दिवशी हे चक्रीवादळ या दोन राज्यांना तडाखा देईल असेही अनुमान आहे. 22 मे पासून या वादळाचा सागरतटाकडे प्रवास सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मच्छीमारांना इशारा
22 मे पासून पुढचे सात दिवस समुद्रात जाऊ नका अशी सूचना आणि धोक्याचा इशारा मच्छीमारांना देण्यात आला आहे. 23 मे या दिवसापासून पश्चिम बंगालच्या सागरतटाच्या दिशेने 55 ते 65 किलोमीटर प्रतीतास वेगाने वारे घोंघावू लागतील. सर्वसाधारणपणे एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये दरवर्षी भारताच्या पूर्व आणि पश्चिम सागरतटावर वादळे येत असतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे.