For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

..तर रायगड प्राधीकरणतर्फेही किल्ले सिंधुदुर्गला निधी

05:55 AM Jun 01, 2021 IST | Abhijeet Khandekar
  तर रायगड प्राधीकरणतर्फेही किल्ले सिंधुदुर्गला निधी
मालवण : बंदरजेटी येथून किल्ले सिंधुदुर्गला नतमस्तक होताना खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती.
Advertisement

खासदार छत्रपती संभाजीराजे यांची माहिती

Advertisement

सिंधुदुर्ग किल्ल्यात जाता न आल्याची खंत

मराठा समाजाला दोन्ही सरकारांनी न्याय द्यावा!

Advertisement

मालवण:

‘तौक्ते’ चक्रीवादळात शिवलंका किल्ले सिंधुदुर्गातील शिवराजेश्वर मंदिर व सभा मंडपावर झाड कोसळून झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सोमवारी मालवण दौऱयावर आलो होतो. पण समुद्रातील वातावरण खराब असल्याने जिल्हा प्रशासनाने सिंधुदुर्ग किल्ला दौरा न करण्याचे आवाहन केल्याने बंदर जेटी येथूनच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक झालो. किल्ल्यातील सभामंडप व अन्य कामांसाठी रायगड किल्ला विकास प्राधिकरणमार्फत काही करता येईल का, यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करणार असल्याचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी येथे सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सध्या संभाजीराजे यांनी राज्यभर रान उठविले असल्याने सोमवारी त्यांच्या मालवण दौऱयानिमित्त शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे स्वत: मालवणात उपस्थित होते. बंदर जेटी येथे संभाजीराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला. सिंधुदुर्ग किल्ल्याशी आमचे एक अतूट नाते आहे. आपला आजचा दौरा मराठा आरक्षणाशी संबंधित नाही. आपण गड-किल्ल्यांचे राजदूत असल्याने केवळ आणि केवळ किल्ले सिंधुदुर्गातील पडझड आणि त्याच्या डागडुजीसंदर्भात असल्याचे स्पष्ट करत सिंधुदुर्ग किल्ल्यात जाता न आल्याने खंतही व्यक्त केली. यावेळी किल्ला रहिवासी सयाजी सकपाळ उपस्थित होते.

केंद्र व राज्य सरकारने न्याय द्यावा!

संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत केंद्र व राज्य सरकारने योग्य तो न्याय द्यावा. या विषयाचे राजकारण होऊ नये ही आमची भूमिका आहे. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी आपली चर्चा झाली असून ते नक्की काही तरी मार्ग काढतील, असा विश्वास मला वाटतो. मी अगोदरपासूनच मराठा समाजाचा योद्धा आहे. मी कोविड योद्धा बनावे, अशी सूचना सरकारकडून केली जात असेल, तर सरकारने 6 जूनपूर्वी आमच्या पाच मागण्या पूर्ण कराव्यात, हीच आमची मागणी आहे. मराठा आरक्षणप्रश्नी आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे जात आहोत. पंतप्रधान नरेंद मोदी यांना मी वैयक्तिरित्या केव्हाही भेटू शकतो. परंतु मला मराठा समाजाचे प्रश्न त्यांच्यासमोर घेऊन जायचे आहे. मराठा आरक्षणप्रश्नी महाराष्ट्रातील खासदारसुद्धा पंतप्रधानांना भेटणार आहेत. त्यामुळे एकत्रितरित्या ही भेट नक्की होईल, असा विश्वास संभाजीराजेंनी व्यक्त केला.

टीका करणं हा ज्याचा-त्याचा प्रश्न!

संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी माझ्यावर कोण काय टीका करतेय हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. मी मात्र कुणावर टीका करीत नाही. मराठा समाजाला न्याय देणे हेच माझे ध्येय आहे. त्यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. माझ्या राजीनाम्याने जर मराठा समाजाला आरक्षण मिळणार असेल, तर खासदारकीचा राजीनामा द्यायला आपण केव्हाही तयार आहोत.

Advertisement
Tags :

.