‘डलास काऊबॉय’च्या ‘एनएफएल’ लढतीदरम्यान तेंडुलकरचा सन्मान
वृत्तसंस्था/ ह्युस्टन, अमेरिका
महान सचिन तेंडुलकरला येथे डलास काउबॉयच्या ‘एनएफएल’ सामन्यादरम्यान विशेष सन्मानार्थ संघाचे मालक जेरी जोन्स यांनी 10 क्रमांकाची जर्सी दिली. हे पाऊल अमेरिकेतील क्रिकेटच्या वाढत्या प्रसाराला अधोरेखित करते. याबाबतीत सचिनने ‘नॅशनल क्रिकेट लीग’मधील त्याच्या सहभागाद्वारे महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
‘नॅशनल क्रिकेट लीग’चा सहमालक या नात्याने तेंडुलकर नवीन अमेरिकन प्रेक्षकांना नाविन्यपूर्ण ‘सिक्स्टी स्ट्राइक्स’ पद्धतीसह क्रिकेटची ओळख करून देण्याचे काम करत आहे. ‘एनएफएल’च्या सर्वांत प्रतिष्ठित स्थळांपैकी एकावर झालेला तेंडुलकरचा सन्मान हा क्रिकेट आणि अमेरिकन क्रीडा जगतील अंतर कमी करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण क्षण आहे.
तत्पूर्वी, रविवारी तेंडुलकरने डलास येथील टेक्सास विद्यापीठात शेकडो तऊण खेळाडूंना प्रेरणा देत ‘एनसीएल’ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नांना सुऊवात केली. ‘क्रिकेटने मला खूप काही दिले आहे आणि इथे डलासमध्ये येऊन या तऊण खेळाडूंना शिकवणे आणि हा अविश्वसनीय सन्मान स्वीकारणे हे खरोखरच भारावून टाकणारे आहे’, असे त्याने सांगितले.
शाहिद आफ्रिदी, सुरेश रैना, शाकिब अल हसन आणि ख्रिस लिन यासारखे प्रसिद्ध खेळाडू समाविष्ट असलेली ‘एनसीएल’ जागतिक क्रिकेट मंचावर स्वत:ला एक प्रमुख उपक्रम म्हणून स्थापित करण्याच्या कामाला लागली आहे. डलासमध्ये मुख्यालय असलेल्या ‘नॅशनल क्रिकेट लीग’ने खेळाडूंच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावण्याच्या बाबतीत सुनील गावसकर, वसीम अक्रम आणि सर व्हिव्हियन रिचर्ड्स यासारख्या क्रिकेट दिग्गजांनाही आकर्षित केले आहे. या लीगला ‘आयसीसी’ने मान्यता दिली आहे.