टेरर फंडिंग प्रकरणी यासीन मलिक दोषी
फुटिरवादी नेत्याला दणका : स्वतःचा गुन्हा केला होता कबूल
वृत्तसंस्था /श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील फुटिरवादी नेता यासीन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणी एनआयए न्यायालयाने दोषी ठरविले आहे. मलिकच्या शिक्षेवर न्यायालयात आता 25 मेपासून युक्तिवाद सुरू होणार आहेत. न्यायालयाने एनआयएला मलिकच्या आर्थिक स्थितीवर अहवाल सोपविण्याचाही आदेश दिला आहे.
चालू महिन्याच्या प्रारंभी मलिकने स्वतःवरील सर्व आरोप मान्य केले होते. यात युएपीए अंतर्गत नोंद गुन्हय़ाचीही कबुली होती. दहशतवादी कारवायांमध्ये सामील असणे, गुन्हेगारी कट रचण्याचाही गुन्हा यात होता.
युएपीएचे कलम 16 (दहतशवादी कारवाया), 17 (दहशतवादी कृत्यांसाठी रक्कम जमविणे), 18 (दहशतवादी गट किंवा संघटनेचा सदस्य असणे) आणि भादंविचे कलम 120 ब (गुन्हेगारी कट) अंतर्गत नोंद गुन्हय़ांना आव्हान देऊ इच्छित नसल्याचे मलिकने न्यायालयासमोर म्हटले होते. मलिक 2019 पासून दिल्लीतील तिहार तुरुंगात कैद आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि अन्य बेकायदेशीर कारवायांसाठी जगभरातून पैसे जमविल्याची कबुली मलिकने दिली होती. न्यायालयाने फारुक अहमद डार उर्फ बिट्टा कराटे, शब्बीर शाह, मसर्रत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, अब्दुल राशिद शेख यांच्यासह अन्य काश्मिरी फुटिरवादी नेत्यांच्या विरोधात आरोप निश्चित केले होते. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सैयद सलाहुद्दीनच्या विरोधातही आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या आरोपींना याप्रकरणी फरार घोषित करण्यात आले आहे.
यासीन मलिक हा फुटिरवादी नेता असून जम्मू-काश्मीर लिबरेशन प्रंटशी संबंधित आहे. काश्मीर खोऱयातील तरुणांची माथी भडकवून त्यांना शस्त्र हाती घेण्यास चिथावण्याचा आरोप त्याच्यावर आहे. मलिकवर 25 जानेवारी 1990 रोजी श्रीनगरमध्ये वायुदलाच्या सैनिकावर हल्ला करण्याचा आरोप आहे. या हल्ल्यात 40 जण जखमी झाले होते. तर 4 सैनिक हुतात्मा झाले होते.