टाटाकडून मॉस्को विमानउड्डाण स्थगित
विमा कंपन्यांनी धोक्याचा इशारा दिल्याने निर्णय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
टाटांच्या एअर इंडिया कंपनीने मॉस्कोला जाणाऱया विमानाचे उड्डाण स्थगित केले आहे. विमा कंपन्यांनी धोक्याचा इशारा दिल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या विमान कंपनीच्या रशियाला जाणाऱया प्रवासी विमानांना विम्याचे संरक्षण देण्यास आंतरराष्ट्रीय विमा अंडररायटर्सनी असमर्थता दर्शविली आहे.
एअर इंडिया कंपनीने या संदर्भात केंद्र सरकारशी संपर्क साधला असून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. विमा कंपन्यांचे मन वळविल्यास मॉस्कोला जाणाऱया प्रवासी विमानांचा मार्ग सुकर होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. एअर इंडिया कंपनीची विमाने प्रत्येक आठवडय़ात रविवार आणि गुरुवार असे दोन दिवस दिल्ली ते मॉस्को उड्डाण करतात. 7 एप्रिलची विमानवारी रद्द करण्याची घोषणा केली गेली असली तरी 3 एप्रिले विमानही रद्द करण्यात आले होते. ही परिस्थिती किती दिवस राहील याविषयीचे अनुमान काढणेही अशक्य असल्याचे स्पष्ट होत आहे.
विदेशी अंडररायटर्स
एअर इंडिया कंपनी प्रत्येक आर्थिक वर्षाच्या प्रथम दिनी, अर्थात 1 एप्रिलला विम्याचे नूतनीकरण करते. ही कंपनी विमानांच्या आणि विमान प्रवासांच्या विमानांसाठी भारताच्या विमा कंपन्यांशी करार करते. यात न्यू इंडिया ऍश्युरन्स, नॅशनल इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटर इन्शुरन्स कंपनी आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या कंपन्यांचा समावेश आहे. मात्र विमा सुरक्षेचे अंडररायटिंग विदेशी विमा कंपन्या करतात. त्यांच्यात ब्रिटनच्या कंपन्यांचा समावेश आहे. या विदेशी कंपन्यांनी अंडररायटिंग करण्यास नकार दिलेला आहे.
युद्धामुळे ही परिस्थिती
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या विमानसेवांवर बंदी घातली आहे. रशियानेही आपले वायूक्षेत्र पाश्चिमात्य विमानांसाठी बंद केले आहे. परिणामी, भारतीय विमानांसाठी अंडररायटिंग करण्यास विदेशी कंपन्यांनी नकार दिला आहे. याचा फटका एअर इंडियाला बसत आहे.