झारखंडमध्ये आता 77 टक्के आरक्षण ?
वृत्तसंस्था / रांची
झारखंडमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अत्यंत मागास वर्ग, मागास वर्ग आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल नागरिकांच्या एकूण आरक्षणाचे प्रमाण आता 77 टक्के होणार आहे. राज्य विधानसभेच्या एकदिवसीय विशेष अधिवेशनात शुक्रवारी याच्याशी संबंधित विधेयकाला आवाजी मतदानाने मंजुरी मिळाली आहे.
हे विधेयक संमत झाल्याने ओबीसींसह अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातींना मिळणाऱया आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. थेट भरतीद्वारे राज्यात होणाऱया शासकीय नियुक्त्यांमध्ये 77 टक्के आरक्षणाची तरतूद आहे. तर मेरिटद्वारे 23 टक्के पदे भरली जाणार आहेत. या विधेयकानुसार राज्यात आता अनुसूचित जातीसाठी 12 टक्के, अनुसूचित जमातीसाठी 26 टक्के, अत्यंत मागास वर्गासाठी 15 टक्के, मागास वर्गासाठी 12 टक्के, आर्थिकदृष्टय़ा दुर्बलांसाठी 10 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिली आहे.