झाकीर नाईकच्या संस्थेवर बंदी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतातून पलायन केलेला इस्लामी धर्मउपदेशक झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने 5 वर्षांची बंदी घातली आहे. या संस्थेकडून मुस्लीम युवकांमध्ये धर्मांधतेची भावना निर्माण करण्याचा आणि त्यांना जेहादी बनण्यासाठी उद्युक्त करण्याचा आरोप या संस्थेवर आहे. त्यामुळे ही संघटना बेकायदा ठरविण्यात आली आहे.
झाकीर नाईक याची भाषणे प्रक्षोभक आहेत. सक्तीची धर्मांतरे घडविण्यात त्याचा हात आहे. प्रत्येक मुस्लिमाने दहशतवादी बनले पाहिजे अशी शिकवण तो देतो. तसेच हिंदूधर्म, हिंदू देवता आणि इस्लाम सोडून इतर धर्मांसंबंधात तो आक्षेsपार्ह आणि निंदनीय विधाने करतो. भारतीय मुस्लिमांनी विदेशात जाऊन दहशतवादी कारवाया कराव्यात यासाठी तो त्यांना प्रोत्साहन देतो, असे गंभीर आरोप झाकीर नाईक याच्यावर ठेवण्यात आले असल्याने त्याच्यावर कारवाई होत आहे. नाईक याच्या संस्थेच्या माध्यमातून समाजात फूट पाडविण्याचे काम केले जाते, असा निष्कर्ष अनेक विदेशी तपास संस्थांनीही काढला आहे.
नाईक याच्या संस्थेच्या समाजविरोधी, बेकायदेशीर कारवाया गुजरात कर्नाटक, जम्मू-काश्मीर, झारखंड, केरळ, महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यांमध्ये सुरु होत्या असे लक्षात आलेले आहे, असेही केंद्र सरकाने त्याच्या संस्थेवर बंदी घालण्याचा आदेश देताना स्पष्ट केले आहे. नाईकच्या बेकायदेशीर कारवायांविरोधात भरपूर पुरावे उपलब्ध आहेत, असे केंद्र सरकारने दहशतवादविरोधी लवादासमोरही स्पष्ट केले होते. नाईक आखाती देशांमधून पैसा गोळा करतो आणि त्याचा उपयोग भारतात समाजविरोधी कारवायांसाठी करतो असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले.