जिल्हय़ात 20 हजार चाकरमानी दाखल
वाडा येथील महिलेच्या संपर्कात आलेल्या 16 जणांचे अहवाल निगेटिव्ह : एक अहवाल प्रलंबित
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात येणाऱया चाकरमान्यांचा ओघ अजून थांबलेला नसून दोन दिवसांत जिल्हय़ात येणाऱया चाकरमान्यांचा आकडा 20 हजारावर पोहोचला आहे. देवगड तालुक्मयातील वाडा येथील महिलेच्या संपर्कात एकूण 19 व्यक्ती आल्या होत्या. त्यातील दोघींचे रिपोर्ट यापूर्वी पॉझिटिव्ह आले आहेत, तर 16 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आणखी एका व्यक्तीचा अहवाल प्राप्त झालेला नाही. तसेच गेल्या चार दिवसांतील 112 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी येथे दिली.
देवगड तालुक्यातील वाडा येथील 51 वषीय कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात 38 व्यक्ती आल्या होत्या. पैकी 19 व्यक्ती अतिजोखमीच्या होत्या. त्यातील संपर्कातील दोन युवतींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, तर 16 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. एक अहवाल अजून आलेला नाही. नेरुर (कुडाळ) येथील त्या रुग्णाच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवालही अद्याप प्राप्त झालेले नाहीत.
112 जणांचे नमुने अहवाल प्रलंबित
जिल्हय़ात एकूण 1 हजार 189 व्यक्ती अलगीकरणात आहेत. त्या पैकी 668 व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले असून 521 व्यक्ती या संस्थात्मक अलगीकरणात आहेत. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 1 हजार 56 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 945 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील आठ अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 937 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 112 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 50 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत सोमवारी 9 हजार 819 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. जिल्हय़ात आढळलेल्या कोरोना बाधित आठ रुग्णांपैकी चार रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून चौघे उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
20 हजार चाकरमानी जिल्हय़ात दाखल
सिंधुदुर्ग जिल्हय़ात जिल्हय़ाबाहेरून येणाऱया लोकांचा ओघ वाढतच असून विलगीकरणची क्षमताही संपली आहे. त्यामुळे जिल्हय़ात येण्यासाठी पास देऊ नये, असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सर्व जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवून कळवले आहे. तरी देखील परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्हय़ांतून सिंधुदुर्ग जिल्हय़ात येणाऱया व्यक्तीची संख्या वाढतच आहे. आज अखेर एकूण 19 हजार 991 व्यक्ती दाखल झाल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली.