जिल्हा हिवताप अधिकाऱयांचे घरातूनच ऑफिसचे काम
घरगुती कामासाठी गाडी फिरतेय कोकण, पुणे अन् कराडला ; ऑफिस चालतेय केवळ कर्मचाऱयांच्या भरोशावर
प्रतिनिधी /सातारा
जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय गुरुवार पेठेतल्या जुन्या दवाखान्याच्या परिसरात आहे. या कार्यालयाला सक्षम असा अधिकारी मिळत नाही. सध्या असलेल्या जिल्हा हिवताप अधिकारी या घरातूनच काम पहात आहेत. ऑफिस चालतेय कर्मचाऱयांच्या भरोशावर असा प्रकार सुरु असून त्यांच्या दिमतीला असलेली गाडी घरगुती कारणासाठी वापरली जात आहे. ही गाडी कोकण, पुणे आणि कराडपर्यंत घरगुती कामाकरता वापरल्याच्या तक्रारी झालेल्या आहेत. त्यामुळे जिल्हा हिवताप कार्यालयालाच हिवताप झाल्याचा प्रकार असून चांगल्या तपासणी देवून उपचाराची गरज आहे.
शासकीय कर्मचारी असेल वा अधिकारी त्यांना शासनाकडून लोकांच्या सेवेसाठी पगार दिला जातो. परंतु काही अधिकारी किंवा कर्मचारी सेवा करण्याऐवजी फक्त शासनाचा मेवा घेतात. तसाच प्रकार साताऱयातील जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयात सुरु आहे. या कार्यालयाला चांगला सक्षम असा अधिकारीच लाभत नसल्याचा इतिहास आहे. असलेले कर्मचारी जो येईल त्या अधिकाऱयांच्या हाताखाली निमूटपणे काम करत आहेत. जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी जंगम या कार्यरत झाल्यापासून त्यांचे कार्यालयात येण्याचे प्रमाण अतिशय दुर्मिळच. त्यातच कोरोना हा त्यांच्यासाठी दुग्धशर्करा योग असल्याचे बोलले जात आहे. सध्याही त्या घरातूनच काम पहातात. कामावर आल्या तर आल्या नाहीतर त्यांची केबीन बंदच असते. त्या आल्यानंतर हजेरीबुकवर सही करतात. तोपर्यंत कार्यालयातील कर्मचारी हे निमूटपणे जशा त्यांच्या फोनवरुन सुचना मिळतील तशी कामे करत असतात. त्यांच्या कार्यालयात त्यांचीच गैरहजेरी असते. त्याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वरीष्ठ कार्यालयाकडे तक्रारीही केल्याचे समजते. त्यामुळे याच कार्यालयाला हिवताप झाला असून वरीष्ठांनी अचानक भेट देवून तपासणी करुन चांगले उपचार करणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.
खाजगी कामासाठी गाडीचा वापर
या कार्यालयाकडे असलेली गाडी चक्क जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी जंगम यांनी त्यांच्या खाजगी कामासाठी वापरली असल्याचे उघडकीस आले आहे. शासकीय गाडी शासकीय कामाकरता दिलेली असती. परंतु या गाडीचा वापर चक्क स्वतःच्या कामाकरता केला आहे. त्यामध्ये दि. 3 जानेवारी 2020 पासू न सलग सहा दिवस कराडला, दि. 27 जानेवारी 2021, दि.19मे 2021 रोजी चिपळूणला, दि. 15 डिसेंबर 2021 ला रत्नागिरीला तसेच ती गाडी रत्नागिरीच्या समुद्रावरही दिसल्याचे काहींनी फोटो काढले आहेत. गाडीच्या रजिस्टरला नोंदी मात्र वेगळय़ाच पहाला मिळतील, अशीही तक्रार झाली आहे.
गुरुवारी दुपारपर्यंत कार्यालयात नव्हत्या
गुरुवारी तरुण भारतच्यावतीने जिल्हा हिवताप कार्यालयास भेट दिली असता जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी जंगम या त्यांच्या कार्यालयात उपस्थित नव्हत्या. त्या दुपारपर्यंत त्यांच्या घरीच होत्या. तेथील कर्मचाऱयांना हालचाल रजिस्टर मागितले असता ते काही कर्मचाऱयांनी दिले नाही. त्यामुळे अधिकारीच काम करत नसतील तर बाकींच्याचे काय सगळा खेळच अशीच चर्चा सुरु होती.