जिल्हा परिषद अध्यक्षपदी विक्रांत जाधव निश्चित
प्रतिनिधी/गुहागर
जिल्ह्य़ाचे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी गुहागर तालुक्यातील अंजनवेल जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले विक्रांत जाधव यांचे नाव निश्चित झाले असल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून प्राप्त झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवड 22 मार्च रोजी होणार आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये उदय बने, विक्रांत जाधव, बाळकृष्ण जाधव, अण्णा कदम यांची नावे आघाडीवर होती. अध्यक्षपद निवडीसाठी या चौघांची नावे पक्षश्रेष्ठींकडे गेली होती. यामधून जाधव यांचे नाव निश्चित झाले असल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून प्राप्त झाली आहे. आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून प्रथमच गुहागर विधानसभा मतदार संघावर शिवसेनेचा आमदार दिला. यामुळे त्यांना मंत्रीपद मिळणार, अशी आशा होती. मात्र त्यांना मंत्रीपद मिळाले नसले तरी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी त्यांचे सुपूत्र विक्रांत जाधव यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित केले असल्याचे समजते. विक्रांत जाधव यांच्या रूपाने गुहागर तालुक्याला पहिल्यांदाच जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान मिळत आहे. त्यांच्या नावाची निश्चिती झाल्याबरोबर कार्यकर्त्यांनी जल्लोषाची जोरदार तयारी केली आहे.