जगातील दुसरी सर्वात मोठी मायक्रोब्लॉगिंग साइट बनली ‘कू’
5 कोटी वापरकर्ते : 10 भाषांमध्ये उपलब्ध
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू’ ला एलॉन मस्कच्या ट्विटर खरेदीचा फायदा होत असल्याचे दिसते. कंपनीचे संस्थापक मयंक बिडवाटका यांच्या मते, आता जगातील दुसरे सर्वात मोठे मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म बनले असून युजर्सची संख्या 5 कोटीवर (50 दशलक्ष) पोहचली आहे.
कूचे सीईओ आणि सह-संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण म्हणाले की, केवळ 2.5 वर्षांत आम्ही आता जगातील दुसऱया क्रमांकाचा मायक्रो-ब्लॉग बनलो आहोत. लाँच झाल्यापासून आमच्या युजर्सनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे.
200 पेक्षा जास्त देशांमध्ये ग्राहक
कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सध्या कू ऍप भारताव्यतिरिक्त अमेरिका, युनायटेड किंगडम, सिंगापूर, कॅनडा, नायजेरिया, यूएई, अल्जेरिया, नेपाळ आणि इराणसह 200 हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे. कू हे जवळपास 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे.
मार्च 2020 मध्ये लाँच
नेटिव्ह मायक्रो-ब्लॉगिंग ऍप म्हणून मार्च 2020 मध्ये लॉन्च केले गेले. कू ला बॉम्बिनेट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, बंगळूरु यांनी बनवले आहे.
ट्विटरचे जगात 22 कोटी ग्राहक
ट्विटरचे जगभरात 22 कोटी सक्रिय ग्राहक आहेत. अमेरिकेत 7.6 कोटी आणि भारतात 2.3 कोटी वापरकर्ते आहेत. जगभरात दररोज सुमारे 50 कोटी ट्विट केले जातात. ट्विटर जुलै 2006 मध्ये लाँच करण्यात आले होते.