जगातील दहा अब्जाधीशांमध्ये मुकेश अंबानींचा समावेश
अदानींच्या संपत्तीमध्ये मागच्या वषी सर्वाधिक वाढ : हुरुन रिच लिस्ट 2022 जाहीर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांचा जगातील टॉप दहा अब्जाधीशांमध्ये समावेश झाला आहे. हुरुन रिच-2022 च्या यादीमध्ये आघाडीवरच्या दहा अब्जाधीशांमध्ये अंबानी समाविष्ट आहेत.
बांधकाम क्षेत्रातील कंपनी एम3एम यांच्यासोबत सदरची नवी यादी हुरुनने नुकतीच सादर केली आहे. गेल्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसले आहे.
अदानींच्या संपत्तीमध्ये वाढ
यादीमधील अदानी यांनी मागच्या एक वर्षाच्या कालावधीत 49 अब्ज डॉलर्स अर्थात 3.7 लाख कोटी रुपये इतकी आपल्या संपत्तीत वाढ केली आहे. अदानी यांनी वर्षभरात प्रत्येक आठवडय़ाला 6 हजार कोटी रुपयांची प्राप्ती प्राप्त केली आहे. 2020 मध्ये 17 अब्ज डॉलर्स असणारी संपत्ती पाचपटीने वाढून 2021 मध्ये 81 अब्ज डॉलर्सवर पोहोचलीय. अंबानींनंतर अदानी हे दुसऱया क्रमांकाचे आशियाई अब्जाधीश गणले जातात. अदानी यांची एकूण संपत्ती 103 अब्ज डॉलर्सची असून यादीमध्ये ते बाराव्या स्थानी आहेत. अदानी यांनी आपल्या संपत्तीमध्ये वर्षाच्या आधारावर पाहता 153 टक्के इतकी वाढ केली असून जागतिक यादीमध्ये ते बाराव्या स्थानी तर अंबानी हे नवव्या स्थानावर आहेत. तर तीन आघाडीवरच्या अब्जाधीशांमध्ये टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क, ऍमेझॉनचे जेफ बेजोस आणि बर्नार्ड अरनॉल्ट यांचा समावेश आहे.
टॉप शंभरमध्ये तीन नवे भारतीय टॉप शंभर यादीत 3 नव्या भारतीयांचा समावेश झाला आहे. यामध्ये सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे प्रमुख सायरस पुनावाला (26 अब्ज डॉलर्सची संपत्ती) 55 व्या स्थानावर, आर्सेलर मित्तलचे कार्यकारी चेअरमन लक्ष्मी मित्तल (25 अब्ज डॉलर्सची संपत्ती) 60 व्या स्थानावर आणि डी-मार्टचे संस्थापक आर. के. दमानी आणि कुटुंबीय (23 अब्ज डॉलर्सची संपत्ती) 67 व्या स्थानावर आहेत. यादीत इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म नायकाच्या फाल्गुनी नायर याही आहेत.