‘चेतक’ची इलेक्ट्रिक स्कूटर सादर
एका चार्जवर धावणार 95 किमी. : अत्याधुनिक सुविधांनी सज्ज
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मागील खुप कालावधीपासून प्रतिक्षेत असणारी बजाज कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर ‘चेतक’ या मॉडेलचे सादरीकरण मंगळवारी करण्यात आले आहे. या स्कूटरची एक्स शोरुम किंमत एक लाख रुपये ठेवण्यात आली आहे. अशी माहिती कंपनीने दिली आहे. या स्कूटरच्या बुकिंगची सुविधा 15 जानेवारीपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
कंपनीने दोन मॉडेलमध्ये याचे सादरीकरण केले असून यात एक अर्बन आणि दुसऱया प्रीमियमचा समावेश आहे. याचे सहा रंगात सादरीकरण झाले असून सोबर व्हाईट, हेजल्नट, सिट्रस रश, वॅल्यूटो रोजो, इंडिगो मेटॅलिक आणि ब्रुक्लन ब्लॅक आदी रंगात चेतक स्कूटर उपलब्ध होणार आहे. बजाज चेतकचे प्रथम पुण्यात सादरीकरण केले होते. परंतु सध्या बेंगळूर, मुंबई,दिल्ली, चेन्नई आणि हैदराबाद आदी शहरांमध्ये सादरीकरण करण्यात आले आहे. रिव्हर्स गिअर आणि तीन वर्षांत 50 हजार किमीची वॉरन्टी कंपनीने दिली आहे.
सुविधा
बजाज चेतक इलेक्ट्रिकमध्ये 3 किलोवॅटची बॅटरी आणि 4080 वॉट क्षमतेची मोटर देण्यात आली आहे. तर पाच तासांच्या कालावधीत स्कूटरची बॅटरी पूर्ण चार्ज होऊ शकत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सदरच्या स्कूटरला इको आणि स्पोर्ट दोन्ही ड्रायव्हिंग मोड देण्यात आला आहे. पूर्ण चार्ज झाल्यास इको मोडवर गाडी धावल्यास ती 95 किलोमीटरचे अंतर पूर्ण करणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने स्कूटरला रेट्रो लुक दिला असून यात राउंड हेडलॅम्प, 12 इंच अलॉय व्हील आणि सिंगल-साइड सस्पेंशनची सुविधा दिलेली आहे.