चीन सीमेवर स्थिती सामान्य नाही : सैन्यप्रमुख
भारतीय सैन्य पूर्णपणे तयार : स्थिती स्थिर परंतु संवेदनशील
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर स्थिती स्थिर आहे, परंतु सामान्य नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अद्याप स्थिती संवेदनशील असल्याचे उद्गार सैन्यप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी काढले आहेत. भारतीय सैन्याच्या वतीने थिंक टॅक सेंटर फॉर लँड वॉरफेयर स्टडीजच्या सहकार्याने आयोजित चाणक्य डिफेन्स डायलॉग 2024 दरम्यान सैन्यप्रमुखांनी हे वक्तव्य केले आहे. भारत आणि चीनमधील या तणावादरम्यान सर्वाधिक ‘विश्वासा’चे नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रणनीतिक स्तरावर दोन्ही बाजूंकडून सकारात्मक संकेत मिळतात, परंतु जोपर्यंत दोन्ही देशांचे कमांडर्स इच्छित नाहीत तोवर कूटनीतिक निर्णय अंमलात आणणे अवघड आहे. चर्चेच्या स्तरावर आम्ही परस्परांना शक्यता आणि पर्याय देत असतो. परंतु प्रत्यक्षात काय घडते हे सर्व सैन्याच्या कमांडर्सवर निर्भर आहे. त्यांनाच निर्णय घ्यावा लागतो. याचमुळे आजची स्थिती स्थिर तर आहे परंतु सामान्य म्हणता येणार नाही. स्थिती संवेदनशील असल्याचे सैन्यप्रमुख द्विवेदी म्हणाले.
पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात 2020 पासून तणावाची स्थिती आहे. आतापर्यंत या तणावाशी संबंधित मुद्द्यांवर तोडगा काढण्यात आलेला नाही. चर्चेद्वारे वादावर तोडगा निघावा आणि एप्रिल 2020 ची जैसे थे स्थिती कायम रहावी अशी भारताची इच्छा आहे. एप्रिल 2020 पूर्वी जशी स्थिती होती ती पुन्हा स्थापिन व्हावी अशी आमची इच्छा आहे. भले मग ती पेट्रोलिंग आणि बफर झोनची बाब असो. आम्ही कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत असे सैन्यप्रमुखांनी म्हटले आहे.
भारत आणि चीनदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी अनेक टप्प्यांमध्ये चर्चा पार पडली आहे. आम्ही मोठा प्रवास केला आहे. तुलनेत सोप्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यात आला आहे. देपसांग आणि डेमचोक समवेत उर्वरित मुद्द्यांवर देखील चर्चा सुरू असल्याचे सैन्यप्रमुखांनी स्पष्ट केले. चर्चेनंतर गलवान खोरे, पँगोंग त्सो, गोगरा आणि हॉट स्प्रिंग्समध्ये डिसएंगेजमेट झाली आहे. तर देपसांग आणि डेमचोकमध्ये अद्याप स्थिती तणावपूर्ण आहे. तेथे दोन्ही देशांचे हजारो सैनिक तैनात आहेत.