चीन सीमेवर लष्कराने वाढवली गस्त
पँगोंग-गलवानमध्ये घोडेस्वार सैनिकांच्या हालचालीत वाढ
वृत्तसंस्था/ लडाख
राजधानी दिल्लीत जी-20 परिषदेदरम्यान नुकतीच चिनी परराष्ट्रमंत्री आणि भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची भेट झाली असताना चीन सीमेवर भारतीय लष्कराने गस्त वाढवल्याचे वृत्त समोर आले आहे भारतीय सैन्याने लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. सतर्कता वाढवल्यामुळे सीमेवर नेमके काय घडणार? याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. ईस्टर्न लडाख मे 2020 पासून चीन आणि भारत यांच्यातील संघर्षाचे केंद्र आहे. या संघर्षामुळे दोन्ही देशांमध्ये लष्करी तणाव देखील वाढला आहे.
लडाख येथील गलवान खोऱयात तैनात असलेल्या भारतीय सैन्याच्या तुकडय़ांच्या हालचाली वाढविण्यात आल्या असून सैन्यातील जवानांनी घोडे आणि खेचरे यांच्या साहाय्याने आसपासच्या भागांचे सर्वेक्षण केले आहे. या व्यतिरिक्त, पँगोंग लेकवर हाफ मॅरेथॉनसारख्या कवायतीही सुरू आहेत. नुकतेच भारतीय सैन्याने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यामध्ये भारतीय सैन्यातील काही जवान हे पूर्व लडाखमध्ये क्रिकेट खेळताना दिसले होते. तथापि, सैनिक क्रिकेट खेळत असलेल्या भागाचा खुलासा भारताच्या सैन्याने केलेला नाही. परंतु मॅपच्या माध्यमातून भारतीय सैनिक क्रिकेट खेळलेले ठिकाण पेट्रोल पॉईंट 14 पासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भागात जून 2020 मध्ये चिनी सैन्याने विश्वासघात करून भारताच्या सैनिकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात देशातील 20 जवान हुतात्मा झाले होते. त्याचबरोबरच चीनचीही मोठी जीवितहानी झाली होती.
गलवान खोऱयात संघर्ष सुरू असल्याने दोन्ही देशांचे लष्कर सतर्क आहे. काही महिन्यांपूर्वी अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये चीन आणि भारताच्या सैन्यात चकमक झाली होती. 2020 मध्ये चीनने पूर्व लडाखच्या सीमावर्ती भागात सरावाच्या निमित्ताने सैन्य तैनात केले. यानंतर चिनी सैन्याने या भागात अनेक ठिकाणी घुसखोरी केली. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्करानेही या भागात मोठय़ा प्रमाणात चिनी सैनिक तैनात केले होते.