चीनकडून लडाखमधील पॉवर ग्रीड लक्ष्य
हॅकर्सचा सायबर हल्ला : इंटेलिजन्स फर्मचा दावा : मजबूत संरक्षण यंत्रणेमुळे यंत्रणा सुरक्षित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चिनी हॅकर्सनी काही महिन्यांपूर्वी लडाखजवळील पॉवर ग्रीडला लक्ष्य केल्याची घटना एका इंटेलिजन्स फर्मच्या अहवालाअंती उघड झाली आहे. या हँकिंगच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती चोरण्याचा त्यांचा हेतू होता. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स येथील ‘रेकॉर्डेड फ्यूचर’ या खासगी गुप्तचर संस्थेने एका अहवालात हा दावा केला आहे. भारत सरकारला यासंबंधी माहिती दिल्यानंतरच त्यांनी हा अहवाल प्रसिद्ध केल्याचे फर्मने म्हटले आहे. दरम्यान, चिनी हॅकर्सनी लडाखजवळील वीज वितरण केंद्रांना लक्ष्य करण्याचे दोन प्रयत्न केले होते, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. अशा सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी आम्ही आधीच आमची संरक्षण यंत्रणा मजबूत केली आहे, असे केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी याबाबत सांगितले आहे.
हॅकर्सनी अलिकडच्या काही महिन्यांत किमान 7 इंडियन स्टेट लोड डिस्पॅच सेंटर्सला लक्ष्य केल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. ही केंदे लडाखमधील भारत-चीन सीमेजवळील भागात ग्रीड नियंत्रण आणि रिअल-टाईम वीज वितरण करतात. याच हॅकर्सच्या गटाने यापूर्वी नॅशनल इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीमलाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याचे अहवालात सांगण्यात आले.
हॅकर्सनी गेल्या 18 महिन्यांत सातत्याने राज्य आणि प्रादेशिक लोड डिस्पॅच केंद्रांना लक्ष्य केले. पहिल्यांदा रेड-इको नावाच्या ग्रुपने हॅकिंगचा प्रयत्न केला आणि त्यानंतर टॅग-38 ग्रुप समोर आला आहे. यावरून असे दिसून येते की, चीन प्रायोजित धमक्मया भारतात दीर्घकाळापासून सक्रिय आहेत. अशाप्रकारचे गट वेगवेगळी माहिती गोळा करण्याच्या संधीच्या शोधात असतात. त्यांच्याकडूनच हा प्रकार घडला असून ते चीनमधीलच असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वीही सायबर हल्ल्याचे कारनामे उघड
रेकॉर्डेड फ्युचरने 12 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबईत 12 तासांच्या ब्लॅकआउटमागे चिनी हॅकर्सचा हात उघड केला होता. आतापर्यंत चिनी हॅकर्सनी भारतातील वीज पुरवठय़ाला अधिक लक्ष्य केले आहे. देशाची अंतर्गत व्यवस्था बिघडवणे हा त्यांचा हेतू आहे. त्याच दिवशी तेलंगणातील 40 उपकेंद्रांनाही या हॅकर्सनी लक्ष्य केले होते. तथापि, कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून अलर्ट मिळाल्यानंतर हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता.
कोरोना लस कंपनीवरही हल्ला
2021 मध्ये देखील चीनमधील हॅकर्सनी भारतातील कोरोनाची लस तयार करणाऱया सीरम इन्स्टिटय़ूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांवर सायबर हल्ले केले होते, असे एका अहवालात सांगण्यात आले होते. मात्र, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून आरोप फेटाळले होते.
अमेरिका-युरोपातील अनेक देशही लक्ष्य
यापूर्वी भारताप्रमाणेच अमेरिका आणि युरोपातील अनेक देशांवर चीनने सायबर हल्ले केले आहेत. 2021 मध्ये, 3 यूएस तपास संस्था नॅशनल सिक्मयुरिटी एजन्सी, सायबर सिक्मयुरिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर सिक्मयुरिटी एजन्सी आणि फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन यांनी संयुक्त निवेदन जारी करून हा आरोप केला होता.