‘चिपी टू गोवा’, चाचणी यशस्वी
अधिकृत परवानगीनंतर प्रथमच एअर लाईन्सच्या विमानाचे लँडिंग, टेकऑफ
भूषण देसाई / परुळे:
चिपी-परुळे येथे उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग विमानतळाला अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर बुधवारी प्रथमच एअर लाईन्सच्या विमानाने यशस्वी चाचणी घेतली. गोव्याहून 11.35 वाजता टेकऑफ घेऊन चिपी येथे 11.59 वाजता यशस्वी लँडिंग झाले.
2018 मध्ये ऑगस्ट महिन्यात गणेश मूर्ती घेऊन या विमानतळावर विमान दाखल झाले होते. त्यानंतर तीनवेळा या विमानतळावर विमान उतरविण्यात आले. यानंतर या विमानतळाच्या उद्घाटनाबाबत ‘तारीख पे तारीख’च्या चर्चा सुरू होत्या. त्यातच राजकीय श्रेयवादाची लढाईही सुरू होती. मात्र, सिंधुदुर्गवासियांचे हवाई प्रवासाचे स्वप्न कधी साकार होणार?, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आता नऊ ऑक्टोबर रोजी बहुचर्चित, बहुप्रतिक्षित विमानतळाचे उद्घाटन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एअर लाईन्सकडून बुधवारी विमानाची चाचणी घेण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनीही या विमानतळावर विमान उतरविले होते. चारवेळा विमानतळावर विमाने उतरली होती. मात्र, त्यावेळी डीजीसीएकडून अधिकृत परवानगी नव्हती. दिल्लीहून आलेल्या डीजीसीए पाहणी पथकाने या विमानतळाबाबत अनेक त्रुटी काढल्या होत्या. धावपट्टी पुन्हा बांधण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आयआरबी कंपनीने लाखो रु. खर्च करून डीजीसीए अधिकाऱयांच्या उपस्थितीत नव्याने रनवेचे बांधकाम केले होते.
इंधन भरण्याचे प्रात्यक्षिकही
त्यानंतर प्रथमच बुधवारी या धावपट्टीवर विमान उतरविण्यात आले. यशस्वी लँडिंग झाल्यानंतर इंधन भरण्याचे प्रात्यक्षिकही झाले. एक तासाच्या कालावधीनंतर पुन्हा या विमानाने गोव्याकडे उड्डाण केले. या दरम्यान कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गोवा-सिंधुदुर्ग हवाई प्रवास अवघ्या चोवीस मिनिटांत या विमानाने पार केला. आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या उद्घाटनाची प्रतीक्षा जिल्हावासीयांना लागली आहे.
मुंबई-सिंधुदुर्ग चाचणीचीही शक्यता
मुंबई-सिंधुदुर्ग अशीही चाचणी घेण्यात येण्याची शक्मयता आहे. मात्र, नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी मुख्यमंत्री, हवाईमंत्री तसेच पेंद्रातील व राज्यातील मंत्री, खासदार, आमदार यांना घेऊन विमान सिंधुदुर्ग विमानतळाच्या धावपट्टीवर उतरणार आहे.
विमानतळावर पोलीस व सिक्मयुरिटी तैनात
विमानतळावर सुरक्षेसाठी सिंधुदुर्ग पोलिसांच्या पाच अधिकाऱयांसह वीस पोलीस कर्मचारी विमानतळावर कार्यरत रहाणार आहेत, तर विमान कंपनीचे चाळीस सिक्मयुरिटी गार्ड तैनात असणार आहेत.
विमानतळ उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलिसांनी विमानतळ परिसराचा ताबा घेतला असून श्वान पथक व पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे. कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.