गोल्ड ईटीएफमध्ये विक्रमी गुंतवणूक
सोन्याला गुंतवणूकीत पसंती : 1611 कोटी रुपयांची गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
करामध्ये करण्यात आलेल्या बदलाचा फायदा गोल्ड ईटीएफ फंडाला झाला असल्याचे पाहायला मिळाले आहे. ऑगस्टमध्ये 1611 कोटी रुपयांची गुंतवणूक गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूकदारांनी केली असल्याचे समजते. ही एक प्रकारची आजवरची विक्रमी गुंतवणूक असल्याचे मानले जात आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये यावर्षी तब्बल 1611 कोटी रुपयांची गुंतवणूक गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडांमध्ये म्हणजेच गोल्ड ईटीएफमध्ये झालेली आहे. या आधी 2020 च्या फेब्रुवारीमध्ये 1483 कोटी रुपयांची गुंतवणूक गोल्ड ईटीएफमध्ये करण्यात आली होती. हा विक्रम ऑगस्ट 2024 मधील 1611 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीने आता मागे टाकला आहे.
कशामुळे वाढली गुंतवणूक?
एलटीसीजी कराचा फायदा तसेच नवीन सॉवरेन गोल्ड बॉंड न आल्याने त्याचा फायदा गोल्ड ईटीएफला झाल्याचे बोलले जात आहे. एकंदर दोन महिन्यांमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये 2948 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ही गुंतवणूक 6 महिन्यांइतकी असल्याचे सांगितले जाते. जुलैमध्ये सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये गोल्ड ईटीएफ फंड आणि गोल्ड फंड ऑफ फंडसाठी एलटीसीजी कर लाभ देण्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनंतर गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले. सोन्याच्या किमतीही काहीशा प्रमाणात कमी झाल्याने अनेकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करणे रास्त मानले. जगभरामध्ये असणारी महागाई आणि त्याचा दबाव त्याचप्रमाणे व्याजदरांबाबत असणारी अनिश्चितता पाहून गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्यायासाठी म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक करणे रास्त मानले आहे.