गोरखनाथ मंदिर प्रवेशद्वारात चाकूहल्ला
दोन पोलीस जखमी, आरोपी आयआयटी पदवीधर : दहशतवादी संबंध तपासणार
गोरखपूर / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्हय़ातील गोरखनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारात एका युवकाने धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले असून या युवकाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार सोमवारी घडला. हल्लेखोर युवकाचे नाव मूर्तझा अहमद असे असून त्याने हल्ला करताना इस्लाम धर्माच्या धार्मिक घोषणा दिल्या होत्या, अशी माहिती गोरखपूर पोलिसांनी पत्रकारांना दिली. या हल्ल्यासंबंधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात चर्चा झाली असून दहशतवादी संघटनांशी या हल्ल्याचा काही संबंध आहे काय? हे तपासले जाणार आहे.
हल्लेखोर गोरखपूरचाच रहिवासी आहे. तोही पोलिसांच्या प्रतिकारात जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणात इस्लामी दहशतवादाचा संबंध आहे काय याचाही शोध घेतला जात आहे. त्याने केलेल्या हल्ल्यात गोपाल गौर आणि अनिल पासवान हे दोन पोलीस जखमी झाले आहेत. हल्लेखोराने प्रथम प्रवेशद्वारातून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला द्वारातच अडविण्यात आले. त्यानंतर त्याने धारदार शस्त्र उपसून हा हल्ला केला.
हा हल्ला झाला तेव्हा मंदिरात मोठय़ा संख्येने भाविक नव्हते. हल्लेखोराने आले शस्त्र आधी लपवून ठेवले होते. त्यामुळे मंदिराबाहेर असणाऱया सुरक्षा सैनिकांना ते दिसू शकले नाही. मात्र, त्याने हल्ला करताच त्याला धरण्यात आले.
प्रथम प्रवेश, नंतर हल्ला
या हल्लेखोराने प्रथम गोरखनाथ मंदिराच्या परिसरात प्रवेश मिळविला आणि नंतर स्वतःजवळच्या चाकूसारख्या धारदार शस्त्राने अचानक सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या पोलिसांवर हल्ला केला. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून त्याचे हात धरले आणि नंतर त्याला ताब्यात घेतले. या झटापटीत दोन्ही पोलिसांना जखमा झाल्या. हल्लेखोराची चौकशी सुरु आहे. त्याने हा प्रकार का केला आणि त्याच्यामागे कोणत्या शक्ती आहेत, याचा तपास सुरु आहे.
धमकीनंतर हल्ला
दोन दिवसांपूर्वी गोरखनाथ मंदिरावर दहशतवादी हल्ला करु, अशी धमकी काही अज्ञातांनी दिली होती. ती खरी ठरल्याचे या घटनेवरुन दिसून येते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातून दहशतवाची पाळेमुळे खणून काढणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर या हल्लेखोराचा तपास केला जात आहे. त्यानुसार अनेक दहशतवादी टोळय़ा नष्ट करण्यात येत आहेत.