गुणवत्तेच्या शिखरावर सिंधुदुर्गच अढळ
बारावीचा निकाल जाहीर : सिंधुदुर्ग सलग नवव्या वर्षी राज्यात प्रथम स्थानावर : कोकण विभागाचीही निर्विवाद बाजी कायम
प्रतिनिधी / ओरोस:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत अपेक्षेप्रमाणे सिंधुदुर्गने 96.57 टक्के निकाल नोंदवत कोकण बोर्डासह राज्य बोर्डातही सलग नवव्या वर्षी अव्वल स्थान पटकावले. कोकण बोर्डानेही आपल्या यशाची परंपरा कायम राखत राज्यात अव्वल क्रमांक कायम राखला, हे विशेष. या वर्षाच्या निकालातील समाधानाची बाब म्हणजे गतवर्षीच्या निकालाच्या तुलनेत यावर्षीही 2.28 टक्क्याने वाढ झाली. गतवर्षी 94.29 टक्के निकाल लागला होता. यावर्षी तो 96.57 टक्क्यांवर पोहोचला.
कुडाळ हायस्कूलच्या पूर्वा राजेश वर्दम व ओरोस डॉन बॉस्को हायस्कूलच्या साक्षी सुनील नाईक यांनी 95.38 टक्के गुण मिळवत जिल्हय़ात प्रथम क्रमांक पटकावला. सावंतवाडी आरपीडी ज्युनियर कॉलेजच्या मेहेक शेख हिने 94.92 टक्के गुण मिळवित दुसरा, सावंतवाडी आरपीडी ज्युनियर कॉलेजच्याच अमृतेश पोकळे याने 94.46 टक्के गुण मिळवत तिसरा, ओरोस डॉन बॉस्को हायस्कूलच्या आर्या केशव भिसे हिने 94.15 टक्के गुण मिळवित चौथा, तर कणकवली महाविद्यालयाच्या वेदांत विजय गावकर याने 94 टक्के गुण मिळवित पाचवा क्रमांक पटकावला.
यावर्षी सिंधुदुर्गात परीक्षेस बसलेल्या एकूण 10,536 विद्यार्थ्यांपैकी 10,175 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये 5,174 मुलगे, तर 5,001 मुलींचा समावेश आहे. जिल्हय़ातील एकूण 91 कनिष्ठ महाविद्यालयांपैकी 31 कनिष्ठ महाविद्यालयांनी 100 टक्के निकाल नोंदवला. जिल्हय़ात बाहेरून बसलेल्या एकूण 187 विद्यार्थ्यांपैकी 77 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 41.18 टक्के एवढा लागला आहे.
सलग नवव्या वर्षी सिंधुदुर्ग अव्वल
सिंधुदुर्गचा एकूण निकाल राज्यात सलग नवव्यावर्षी अव्वल ठरला. यावर्षी हा निकाल 96.57 टक्के एवढा लागला. गतवर्षी तो 94.29 टक्के एवढा होता. सिंधुदुर्गपाठोपाठ लगतच्या रत्नागिरी जिल्हय़ानेही 95.52 टक्के निकाल नोंदवत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. रत्नागिरीपाठोपाठ बुलढाणा जिल्हा 94.22 टक्के निकाल नोंदवत राज्यात तृतीय क्रमांकावर, तर गोंदिया 94.13 टक्क्यांसह चौथ्या, वाशिम 94.08 टक्क्यांसह पाचव्या, सोलापूर 93.74 टक्क्यांसह सहाव्या, भंडारा 93.58 टक्क्यांसह सातव्या, कोल्हापूर 93.11 टक्क्यांसह आठव्या, लातूर 92.61 टक्क्यांसह नवव्या, नागपूर 92.53 टक्क्यांसह राज्यात दहाव्या क्रमांकावर राहिला. यातील ठळक बाब म्हणजे विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाणारा पुणे गतवर्षीप्रमाणे यावर्षीही पहिल्या दहात स्थान मिळवू शकला नाही. तसेच सातारा, सांगली व परभणी हे तीन जिल्हेही दहा क्रमांकाच्या बाहेर राहिले.
कोकण बोर्डाच्या स्थापनेपासून कोकण बोर्डाने राज्यात अव्वल येण्याची आपली परंपरा यावर्षीही कायम राखली. या अव्वल परंपरेचे हे यावर्षीचे सलग नववे वर्ष होय. यावर्षी कोकण विभागाचा निकाल 95.89 टक्के एवढा लागला.
जिल्हय़ाचा शाखानिहाय निकाल
शाखा बसलेले विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी टक्के
विज्ञान 2,747 2,734 99.53
कला 2,447 2,195 89.70
वाणिज्य 4,433 4,384 98.89
व्यवसाय शिक्षण 0,909 0,862 94.83
जिल्हय़ाचा बहिस्थ विद्यार्थी निकाल
शाखा बसलेले विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी टक्के
विज्ञान 55 24 43.64
कला 87 35 40.23
वाणिज्य 14 08 57.14
व्यवसाय शिक्षण 31 10 32.26