‘गुणवंत’ शाळांचा शिवसेना करणार गौरव
16 ऑगस्टला सिंधुदुर्गनगरीमध्ये कार्यक्रम
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
दहावी व बारावीमध्ये यश संपादन करणाऱया विद्यार्थ्यांसोबतच 100 टक्के निकालाची परंपरा अबाधित ठेवणाऱया शाळांचा सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून गौरव करण्यात येणार आहे. 16 ऑगस्टला येथील शरद कृषी भवनमध्ये दुपारी 2.30 वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती शिवसेना नेते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी झूम ऍपच्या माध्यमातून पत्रकार परिषदेत दिली.
2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी घेतलेल्या माध्यमिक व उच्चमाध्यमिक शालांत परीक्षेमध्ये व युपीएससी परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हय़ातील दोन विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश व जिल्हय़ातील 117 शाळांनी 100 टक्के निकाल प्राप्त करून प्रशंसनीय यश संपादन केले आहे. गुणवंतांना प्रेरणा मिळावी, म्हणून त्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्यावतीने त्यांचा गौरव केला जाणार आहे.
खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गनगरी येथे 16 ऑगस्ट रोजी शरद कृषी भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. कोविड-19 च्या अनुषंगाने अटी-शर्तीचे पालन करून या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. या कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थिनी, संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन जिल्हा शिवसेनेच्यावतीने सतीश सावंत व संजय पडते यांनी केले आहे.