For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुजरात रणकंदन 02-12-2022

07:00 AM Dec 02, 2022 IST | Tarun Bharat Portal
गुजरात रणकंदन 02 12 2022
Advertisement

रामभक्तांच्या गुजरातमध्ये काँग्रेसकडून ‘रावणा’ची उपमा

Advertisement

पंतप्रधान मोदींचे काँग्रेसला प्रत्युत्तर : जितकी चिखलफेक कराल, तितकेच कमळ फुलणार

विधानसभा निवडणुकीच्या दुसऱया टप्प्यातील प्रचारासाठी गुजरातमध्ये पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेत्यांमध्ये मला उद्देशून अपशब्द बोलण्याची शर्यत सुरू आहे. परंतु काँग्रेस जितकी चिखलफेक करणार, तितकेच कमळ फुलणार आहे. एकेकाळी आमच्या पक्षाची अनामत रक्कम जप्त व्हायची, तरीही आम्ही कुणालाच शिव्या देत नव्हतो. जनतेने मला दिलेली शक्ती पाहून काँग्रेस अस्वस्थ होत आहे. काँग्रेस पक्ष रिमोट कंट्रोलद्वारे चालतो, रिमोट कंट्रोलने चालणाऱया नेत्याने मोदीला ‘औकात’ दाखवून देऊ असे म्हटले होते. मग दुसरा नेता आला आणि त्याने त्याहून मोठी शिवी दिल्याचे म्हणत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

Advertisement

काँग्रेसने मग नवे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनाच पाठविले. मी त्यांना ओळखतो आणि त्यांचा आदर करतो. पक्षनेतृत्वाने जे सांगितले गेले तेच खर्गे इथे बोलले. काँग्रेस पक्षाला गुजरात रामभक्तांचे आहे, माहित नाही. काँग्रेस पक्ष यापूर्वी रामसेतूचे अस्तित्व नाकारत होता. काँग्रेसने आता रामायणातून रावण हा शब्द प्रचारात आणल्याची टीका मोदींनी केली आहे. काँग्रेस नेते मला शिवी देतात यात कुठलेच आश्चर्य नाही. काँगेस पक्षाचे नेते कुठलीच खंत व्यक्त करत नाहीत किंवा चूक मान्य करत नाही या गोष्टीचे आश्चर्य आहे. काँगेसचा लोकशाहीवर विश्वास नाही. काँग्रेसमध्ये एका परिवाराला आनंदी करण्यासाठी चढाओढ सुरू असते. याचमुळे मला शिव्या वाहण्याची फॅशन काँग्रेसमध्ये रुढ झाली आहे. कुणी शिवी देतो, दुसरा येतो आणि तो त्याहून मोठी शिवी वाहतो. कुणी मला रावण म्हणतो, तर कुणी राक्षस ठरवितो. एका नेत्याने मला झुरळ देखील म्हटले. काँग्रेस जितकी चिखलफेक करेल, तितकेच कमळ फुलणार असल्याचे मोदींनी सभेत म्हटले आहे.

जगात भारताचा नावलौकिक

सद्यकाळात जगात भारताचा नावलौकिक पसरू लागला आहे. आज (गुरुवार)चा दिवस अत्यंत ऐतिहासिक आहे. गुजरातमध्ये आज मतदान होत असून यात लोकांचा उत्साह दिसून येत आहे. याचबरोबर आजपासून भारत जगातील सर्वात श्रीमंत 20 देशांच्या समुहाचा अध्यक्ष झाला आहे. ही अत्यंत मोठी कामगिरी आहे. हे 20 देश पूर्ण जागतिक व्यापारात 75 टक्के हिस्सेदारी बाळगून असल्याचे उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत.

पटेल पंतप्रधान झाले असते तर...

सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते तर देशाची दिशाच बदलून गेली असती. गुजरात आता विकसित झाले आहे. या निवडणुकीत भाजपच विजयी होणार आहे. मागील 20 वर्षांमध्ये गुजरातच्या प्रत्येक क्षेत्राचा आम्ही विकास केला आहे. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हाच आमचा मूलमंत्र असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

रविंद्र जडेजाच्या पत्नीला घरातूनच विरोध

क्रिकेटपटूच्या बहिणीकडून विरोधात प्रचार

जामनगर उत्तर हा मतदारसंघ चर्चेत आला आहे. या मतदारसंघात क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा भाजपची उमेदवार आहे. रिवाबाच्या उमेदवारीला रविंद्र जडेजाचे वडिल अनिरुद्ध सिंह आणि बहिण नैना यांचाच विरोध आहे.

काँग्रेससाठी प्रचार करणाऱया नैना जडेजाने स्वतःची भूमिका मांडली आहे जामनगरमध्ये अनेक कुटुंबातील सदस्य विविध पक्षांसाठी काम करत आहेत. प्रत्येकाने स्वतःला मान्य असलेल्या विचारसरणीनुसार योगदान देणे अभिप्रेत आहे. माझ्या भावासाठी माझे प्रेम कायम राहणार आहे. तर माझी वहिनी रिवाबा ही भाजपची उमेदवार आहे आणि ती कुटुंबीय म्हणून चांगली असल्याचे नैनाने म्हटले.

मी स्वतः काँग्रेस पक्षासोबत आहे, पक्षाचा मुद्दा कौटुंबिक स्वरुपाचा नाही. मी काँग्रेस पक्षात अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. राजकारणामुळे कुटुंबात कुठलाच कलह नसल्याचा दावा अनिरुद्ध सिंह यांनी केला आहे.

विजयाचा दावा

एकाच कुटुंबामध्ये वेगवेगळय़ा विचारसरणीचे लोक असू शकतात. जामनगरच्या लोकांवर माझा भरवसा आहे. आम्ही विकासावर लक्ष केंद्रीत करणार आहोत आणि यंदाही भाजप मोठय़ा फरकाने विजयी होणार असल्याचा दावा रिवाबा जडेजा यांनी केला आहे.

290 कोटी रुपयांची सामग्री जप्त

रोख रक्कम, अमली पदार्थ अन् मद्याचा समावेश

निवडणूक होत असलेल्या गुजरात राज्यामध्ये आतापर्यंत 290 कोटी रुपयांहून अधिक मूल्याची रोख रक्कम, मद्य आणि वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. 2017 च्या निवडणुकीदरम्यान झालेल्या कारवाईच्या तुलनेत हा आकडा 10 पट अधिक आहे. गुजरातमध्ये मंगळवारी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून 5 डिसेंबर रोजी दुसऱया टप्प्यासाठी मतदान होणार आहे.

विविध कायदा अंमलबजावणी यंत्रणांच्या माध्यमातून ही सामग्री जप्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. एटीएस अधिकाऱयांचे एक पथक वडोदरा जिल्हय़ात याकरता विशेष मोहीम राबवत आहे. या पथकाने मेफेड्रोन औषध निर्माण करणाऱया प्रकल्पांची ओळख पटविली आहे तसेच सुमारे 478 कोटी रुपयांच्या मूल्याच्या 143 किलोग्रॅम मेफेड्रोन (सिंथेटिक औषध)चा शोध लावला आहे.  नडियाद आणि वडोदरा येथून 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. एटीएस पोलीस स्थानकात यासंबंधी विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोहीम अद्याप सुरू असून ती पूर्ण झाल्यावर विस्तृत माहिती उपलब्ध करण्यात येणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

असदुद्दीन ओवैसींकडून काँग्रेस लक्ष्य

गुजरात निवडणूक सोडून राहुल गांधी यात्रेत मग्न

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन पक्षाचे अध्यक्ष अन् खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी एका सभेला संबोधित करताना काँग्रेसला लक्ष्य केले आहे. काँग्रेस नेते तुमच्या दारात आले तर त्यांना तुमचा पक्ष निवडणुकीत विजयी होतोय का, असे विचारा असे ओवैसी यांनी उपस्थित समुदायाला उद्देशून म्हटले
आहे.

गॅस सिलिंडर महागला असून लोकांकडे नोकऱया नाहीत, तर नोकरीत असलेल्या लोकांना पगार कमी आहे, या सर्व समस्या कोण सोडविणार? काँग्रेस नेते तुमच्या मते मागण्यासाठी आले तर टोपी आणि शेरवानी परिधान करणारा ‘दीवाना’ काँग्रेस गुजरात निवडणुकीत विजयी होतोय का असे विचारत होता असे त्यांना सांगा. काँग्रेसच्या विजयावर प्रश्न उपस्थित केल्यास हे जोकर्स (विदूषक) उत्तर देऊ शकणार नाहीत. ते केवळ औवैसींच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका असे म्हणतील अशी टीका एआयएमआयएमच्या नेत्याने केली आहे. निवडणुकीची लढाई गुजरातमध्ये सुरू असताना काँग्रेस पक्षाचा नेता मध्यप्रदेशात पायी फिरत आहे. अशाप्रकारे लढाई लढली जात नाही. खरी लढाई आम्ही लढत आहोत. राहुल गांधींना भारत जोडो यात्रा सोडावी लागू नये म्हणून काँग्रेसने भाजपच्या हाती विजय सोपविल्याचा आरोप ओवैसी यांनी केला आहे.

 बिलकिस बानो यांचे गुन्हेगार पुन्हा नरेंद्र मोदींच्या नावावर मते मागत आहेत. या मुद्दय़ावर काँग्रेस काहीच बोलणार नाही. काँग्रेसचा राजकीय स्वार्थ आम्हा सर्वांना समजून घ्यावा लागणार आहे. याचमुळे लोकांनी अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेत मतदान करावे असे आवाहन करत असल्याचे ओवैसी यांनी म्हटले आहे.

आप उमेदवाराला 6 महिन्यांची शिक्षा

भरूच येथील एका स्थानिक न्यायालयाने धनादेश न वटल्याप्रकरणी अंकलेश्वर येथील आम आदमी पक्षाचे उमेदवार अंकुर पटेल यांना दोषी ठरवत 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये पटेल यांनी दोन लाख रुपयांचा धनादेश जारी केला होता. परंतु हा धनादेश वटू शकला नव्हता. यामुळे सलीम वाडिया यांना तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाने निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट्स ऍक्टचे कलम 138 अंतर्गत पटेल यांना दोषी ठरविले आहे.

सलीम वाडिया यांनी अंकुर पटेल यांना 8 लाख रुपये दिले होते. वाडिया यांनी या रकमेची मागणी केल्यावर पटेल यांनी त्यांना दोन धनादेश दिले होते. यातील एक धनादेश 5 लाख रुपयांचा तर दुसरा दोन लाख रुपयांचा होता. दोन्ही धनादेश न वटल्याने बँकेकडून परत करण्यात आले होते, अशी माहिती तक्रारदाराच्या वकिलाने दिली आहे.

काही तांत्रिक कारणामुळे आम्ही 5 लाख रुपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी आव्हान देऊ शकत नव्हतो. परंतु दोन लाख रुपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी एनआय अधिनियमाच्या अंतर्गत आव्हान दिले होते. न्यायालयाने अंकुर पटेल यांना दोषी ठरविले आहे. सुनावणीवेळी ते अनुपस्थित राहिल्याने पटेल यांना शिक्षाही सुनावण्यात आल्याचे तक्रारदाराच्या वकिलाकडून सांगण्यात आले.

इमरान प्रतागढींच्या सभेत गोंधळ

एआयएमआयएम अन् काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट

गुजरातमधील गोध्रा येथे पोहोचलेले काँगेस खासदार इमरान प्रतापगढी यांच्या सभेत गोंधळ झाला आहे. या गोंधळामुळे प्रतापगढी यांना सभा अर्धवट सोडून द्यावी लागली आहे. एआयएमआयएम संबंधी केलेल्या विधानामुळे गोंधळ निर्माण झाला होता. एमआयएमआयएमवरील टिप्पणीनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली तसेच ओवैसी यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रतापगढी यांना घेरले होते. वातावरण बिघडत चालल्याचे पाहून इमरान यांना सभेतून निघून जावे लागले आहे.

इमरान प्रतापगढी हे काँगेस उमेदवाराच्या प्रचारासाठी गोध्रा येथे पोहाचले होते. गोध्रा हा मतदारसंघ मुस्लीम बहुल आहे. याचमुळे या मतदारसंघात काँग्रेस आणि ओवैसी यांच्या पक्षात अत्यंत चुरस दिसून येत आहे. गोध्रा येथील सभेत इमरान यांनी एआयएमआयएम संबंधी विधाने करण्यास सुरुवात केल्यावर मोठय़ा संख्येत ओवैसी समर्थक तेथे पोहोचले. यानंतर दोही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुरू झाली. तणावाची स्थिती पाहता काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी हस्तक्षेप करत प्रतापगढी यांना सभास्थळावरून सुरक्षित बाहेर काढले आहे.

Advertisement
Tags :

.