खोटा गुन्हा दाखल करणाऱयांवर कडक कारवाई करावी
प्रतिनिधी/ सातारा
माझ्यावर दि.11 रोजी खोटा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्याशी माझा दुरान्वये संबंध नाही. जी व्यक्ती गुन्हा दाखल करायला पोलीस ठाण्यात गेली होती. तीने कायद्याचा गैरवापर केला आहे. खोटा गुन्हा दाखल करणाऱयांवरच चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी प्रभागातील नागरिक मंगळवारी शांततेच्या मार्गाने लोकशाही पद्धतीने मोर्चा काढणार आहेत. दि.11 रोजी मी प्रभागातच नव्हतो, अशी माहिती नगरसेवक रवीभैय्या ढोणे यांनी दिली. दुबळेकडून चुकीच्या पद्धतीने विरोध होत आहे. विक्रांत दुबळे हा अवैध व्यवसाय करतो, त्यांने दाखल केलेल्या खोटय़ा गुह्याची चौकशी करुन त्याच्यावर गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
नगरसेवक रवींद्र ढोणे यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, माझ्या प्रभागातील जे मतदार आहेत. त्या मतदारांसाठी मी आमचे नेते आमदार श्री. शिवेंद्रराजे आणि कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वहिनीसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे करतो. कामे चांगल्या दर्जाची होत आहेत. वॉर्डाचा विकास होत आहे. त्यामुळेच काहीजणांना खूपू लागले आहे. त्यामुळे खोटय़ा तक्रारी करणे, खोटे गुन्हे दाखल करणे असा प्रकार सुरु झालेला आहे. येत्या निवडणूकीत मी निवडणूक लढवत असल्याने विरोध म्हणून सुरु आहे. माझ्यावर गुन्हा दाखल करताना पोलिसांनी दुसरी बाजू म्हणून मला बोलवायला हवे होते. तसे बोलवलेही नाही. मी दि. 11 रोजी प्रभागातच नव्हतो. सकाळपासून दिवसभराचे माझे शेडय़ुल दाखवतो. 1 वाजता मी राजू भैय्यांच्या एका कार्यक्रमानिमित्ताने गेलो होतो. अप्पा वायदंडे यांनी त्यांच्या जागेतून गटरचे काम त्यांच्या स्वखर्चाने करत आहेत. त्यांनीच जेसीबी बोलवून काम केले. त्याचे पैसेही त्यांनी दिले. मी त्या दिवशी तेथे नव्हतो. राजकीय द्वेषातून निवडणूकीमध्ये मी उभा राहणार असल्याने असे खोटे गुन्हे दाखल करण्याचे दुबळे याच्याकडून सुरु आहे. विनाकारण अन्याय होतो आहे. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. परंतु कायद्याचा गैरवापर करणेही चुकीचे आहे. माझ्या वॉर्डात सर्व समाजाचे नागरिक रहातात. प्रत्येक नागरिकांना पालिकेच्या माध्यमातून सोयीसुविधा पुरवणे हे माझे नगरसेवक म्हणून आद्य कर्तव्य आहे. कोणी विरोध करत असेल म्हणून लोकहिताची कामे थांबवायची का?, असाही प्रश्न रवी ढोणे यांनी उपस्थित केला.
नियमाने कायदेशीर व्यवसाय करतो
परवानाधारक दारु विक्रीचा व्यवसाय करतो. शासनाला महसूल नियमाने भरतो. अवैध असा कोणताही व्यवसाय करत नाही. आणि हा आमचा पिढीजात व्यवसाय आहे. जे लोक वैयक्तिक, राजकीय द्वेषापोटी आमच्या दारुच्या दुकानावरुन बोलत असतात त्यांनी चांगला व्यवसाय द्यावा, परंतु दुसऱया बाजूला हेही त्यांनी पहावे की ज्याने माझ्यावर गुन्हा दाखल केला तो मटक्याच्या अडय़ावर बसतो. त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून बोलणार का?, असा प्रश्न नगरसेवक रवी ढोणे यांनी उपस्थित केला.
मंगळवारी वॉर्डातील नागरिक मोर्चा काढणार
पोलिसांनी गुन्हा दाखल करताना मला बोलवून घ्यायला पाहिजे होते. नेमकी काय परिस्थिती आहे ते ऐकून घ्यायला पाहिजे होते. तसे न करता खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याने वार्डातील नागरिक मंगळवारी मोर्चा काढणार आहेत. लोकशाही पद्धतीने सनदशीर मार्गाने हा मोर्चा काढण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
दुबळेंकडून राजकीय विरोधातून तक्रारी
पाठीमागच्या निवडणूकीवेळी वहिनीसाहेबांच्या विरोधात सध्याच्या तक्रारदाराची वहिनी उभी होती. गणेश दुबळे यांनी त्यावेळी केलेले वक्तव्य पहा. दुबळेंकडून राजकीय विरोधातून तक्रारी होत असतात. यापूर्वीही रस्त्याच्या कामामध्ये आडकाठी आणली होती. त्यावेळी पोलिसांनी बाजू ऐकून घेवून सहकार्य केले. आता बाजू ऐकून घेतली नाही, असेही त्यांनी सांगितले.
मीडियाकडे सीसीटीव्ही फुटेज सादर
रवी ढोणे यांनी दि. 11 रोजी प्रभागात नव्हतो, असे सांगत दिवसभर ज्या ज्या ठिकाणी गेलो होतो. तेथील सर्व फुटेज व लोकेशनचे पुरावेच पत्रकारांच्या समोर मांडले. कायद्याचा गैरवापर किती करावा, कायदे चांगल्यासाठी असताना दुरुपयोग करु नये, असेही त्यांनी सांगितले.