‘खान’ असल्यानेच शाहरुखपुत्र लक्ष्य
मेहबूबा मुफ्तींचा भाजपवर गंभीर आरोप
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील राजकी पक्ष पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी शाहरुख खानचा पुत्र आर्यन प्रकरणी भाजपवर निशाणा साधला आहे. लखीमपूर खीरीची घटना केंद्राला दिसत नाही. पण 23 वर्षीय युवकाला केंद्रीय यंत्रणा लक्ष्य करत आहेत. केवळ खान आडनाव असल्यानेच आर्यनला त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मेहबूबा यांनी याप्रकरणी सोमवारी ट्विट करत अमली पदार्थांच्या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. चार शेतकऱयांच्या हत्येचा आरोपी केंद्रीय मंत्र्याच्या पुत्राचे उदाहरण देण्याऐवजी केंद्रीय यंत्रणा 23 वर्षीय युवकाच्या मागे हात धावून लागल्या आहेत. त्याचे आडनाव खान असल्यानेच हे घडत असल्याचा दावा मेहबूबा यांनी केला आहे.
मतपेढीचा खूश करण्याचा प्रकार
स्वतःच्या मतपेढीला खूश करण्यासाठी मुस्लिमांना लक्ष्य करण्याचा आरोप पीडीपी अध्यक्षांनी भाजपवर केला आहे. यापूर्वी मेहबूबा यांनी केंद्र सरकारवर राजकीय लाभासाठी ‘बळा’च्या वापराचे धोरण अवलंबिल्याचा आरोप केला होता. जम्मू-काश्मीरमध्ये स्थिती बिकट होत चालली असल्याचेही त्यांनी म्हटले होते. सुधारणा करण्याऐवजी भारत सरकार निवडणुकांमध्ये राजकीय लाभ प्राप्त करण्यासाठी बळाच्या वापराचे धोरण सुरुच ठेवणार आहे. पुढील वर्षी उत्तरप्रदेशात निवडणूक होणार असल्याने हे घडणार असल्याचा आरोप त्यांनी केला होता.