क्रिप्टो करन्सी कधीही वैध चलन होऊ शकत नाही !
अर्थ सचिव सोमनाथ यांचे प्रतिपादन : डिजिटल चलनावर कर लागू होण्याचे अर्थसंकल्पात संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या जगासह भारतामध्ये क्रिप्टो करन्सीची (आभासी चलन) वादळी चर्चा सुरु आहे. यामध्ये विविध प्रकारची गुंतवणूक करण्यासंदर्भात आजही तर्कवितर्क लावले जात आहेत. परंतु क्रिप्टो करन्सी हे चलन कधीही वैध होणार नसल्याचे अर्थ सचिव टी.व्ही.सोमनाथ यांनी स्पष्ट केले आहे. कारण खासगी डिजिटल चलन कधीही कायदेशीर चलन होऊ शकत नसल्याचेही स्पष्टीकरण सचिवांनी दिले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू आठवडय़ात संसदेत 2022-23 साठी अर्थसंकल्पातील क्रिप्टोकरन्सी आणि अन्य डिजिटल संपत्तीमध्ये देवाणघेवाणीच्या लाभासह 30 टक्के कर लागू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यासोबतच एका ठराविक मर्यादेनंतर देवाणघेवाणीवर एक टक्के टीडीएस लागणार असल्याचीही घोषणा केली होती.
सोन्या-हिऱयाप्रमाणेच अवैध
ज्या प्रकारे सोने व हिरा मूल्यवान असूनही ते वैध असे चलन नाही त्याप्रमाणेच खासगी क्रिप्टो करन्सी कधीही वैध मुद्रा होऊ शकत नसल्याचे माझे मत आहे, असे सचिव सोमनाथ यांनी म्हटले आहे.
आरबीआयचा रुपयाच वैध चलन
फक्त भारतीय रिझर्व्ह बँकेचे डिजिटल रुपये देशामध्ये वैध चलन होऊ शकते. यामध्ये कायद्याची बाजू पाहिल्यास वैध चलनाचा अर्थ असा होतो की, त्याच्या मदतीने कर्जाचे व्यवहार स्विकारता येऊ शकतात. यामुळे भारत कोणत्याही क्रिप्टो संपत्तीला वैध चलन बनवू शकणार नसल्याचेही यावेळी सोमनाथ यांनी नमूद केले आहे.