कोलकाता नाईट रायडर्सचा 7 गड्यांनी विजय
आरसीबीचा दुसरा पराभव : वेंकटेश अय्यरचे अर्धशतक,सुनील नरेनची फटकेबाजी, कोहलीचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथे शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या 2024 च्या आयपीएल स्पर्धेतील 10 व्या सामन्यात सुनील नरेनची जोरदार फटकेबाजी आणि वेंकटेश अय्यरच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा 19 चेंडू बाकी ठेऊन 7 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतील कोलकाता संघाचा हा दुसरा विजय असून बेंगळूर संघाचा दुसरा पराभव आहे. स्पर्धेच्या गुणतक्त्यात आता चेन्नई पहिल्या, कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या आणि राजस्थान रॉयल्स तिसऱ्या स्थानावर आहेत. या तिन्ही संघांनी प्रत्येकी 4 गुण मिळविले असले तरी सरस धावगतीवर चेन्नईने आघाडीचे स्थान कायम राखले आहे.
यजमान रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 183 धावांचे आव्हान दिले होते. बेंगळूरने 20 षटकात 6 बाद 182 धावा जमविल्या. विराट कोहलीचे नाबाद अर्धशतक वाया गेले. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने 16.5 षटकात 3 बाद 186 धावा जमवित या स्पर्धेतील दुसरा विजय नोंदविला.
कोलकाता संघाच्या डावाला सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी आक्रमक सुरुवात करुन देताना 39 चेंडूत 86 धावांची भागिदारी केली. सुनील नरेनने 22 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांसह 47 धावा तर सॉल्टने 20 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 30 धावा जमविल्या. कोलकाता संघाची ही सलामीची जोडी बाद झाल्यानंतर वेंकटेश अय्यर आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या गड्यासाठी 75 धावांची भर घातली. वेंकटेश अय्यरने 30 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 50 धावा जमविल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने 24 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 39 तर रिंकू सिंगने नाबाद 5 धावा जमविल्या. कोलकाता संघाला अवांतराच्या रुपात 15 धावा मिळाल्या.
कोलकाता संघाने पॉवरप्लेच्या 6 षटकात विक्रमी 85 धावा झोडपल्या. या मोसमात पॉवरप्लेमध्ये नोंदवलेली ही सर्वाधिक धावसंख्या आहे. कोलकाता संघाचे अर्धशतक 21 चेंडूत, शतक 52 चेंडूत तर दीडशतक 84 चेंडूत फलकावर लागले. वेंकटेश अय्यरने 29 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह अर्धशतक झळकाविले. या सामन्याला सुमारे 34 हजार शौकीन उपस्थित होते. बेंगळूर संघातर्फे यश दयाल, डागर आणि विशाख यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. कोलकाता संघाच्या डावात 13 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले.
कोहलीचे नाबाद अर्धशतक
तत्पूर्वी, कोलकाता संघाने नाणेफेक जिंकून बेंगळूरला प्रथम फलंदाजी दिली. कोहली आणि कर्णधार डु प्लेसिस यांनी 12 चेंडूत 17 धावांची भर घातल्यानंतर हर्षित राणाने डु प्लेसिसला स्टार्ककरवी झेलबाद केले. त्याने 6 चेंडूत 1 षटकारासह 8 धावा जमविल्या. कोहली आणि ग्रीन यांनी आक्रमक फटकेबाजी करत 7 षटकात 65 धावांची भागिदारी दुसऱ्या गड्यासाठी केली. रसेलच्या गोलंदाजीवर ग्रीन त्रिफळाचीत झाला. त्याने 21 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 33 धावा जमविल्या. एका बाजूने कोहली संघाची धावसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असताना गेल्या दोन सामन्यात फलंदाजीत अपयशी ठरलेला मॅक्सवेलने यावेळी मात्र 19 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 28 धावा जमविताना कोहलीसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 42 धावांची भागिदारी केली. सुनील नरेनने मॅक्सवेलला झेलबाद केले. रजत पाटीदार आणि अनुज रावत हे मात्र प्रत्येकी 3 धावांवर बाद झाले. कोहली आणि दिनेश कार्तिक यांनी सहाव्या गड्यासाठी 31 धावांची भर घातल्याने बेंगळूरला 182 धावांपर्यंत मजल मारता आली. कोहलीने 59 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 83 तर कार्तिकने 8 चेंडूत 3 षटकारांसह 20 धावा केल्या. डावातील शेवटच्या चेंडूवर कार्तिक धावचीत झाला.
बेंगळूरने पॉवरप्लेच्या 6 षटकात 61 धावा जमविताना 1 गडी गमविला. बेंगळूरचे अर्धशतक 34 चेंडूत, शतक 71 चेंडूत तर दीडशतक 103 चेंडूत फलकावर लागले. कोहलीने 36 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. बेंगळूरच्या डावात 11 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. कोलकाता संघातर्फे हर्षित राणाने तसेच आंद्रे रसेलने प्रत्येकी 2 तर सुनील नरेनने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर 20 षटकात 6 बाद 182 (विराट कोहली नाबाद 83, डु प्लेसिस 8, ग्रीन 33, मॅक्सवेल 28, पाटीदार 3, रावत 3, दिनेश कार्तिक 20, अवांतर 4, हर्षित राणा 2-39, रसेल 2-29, सुनील नरेन 1-40), कोलकाता नाईट रायडर्स : 16.5 षटकात 3 बाद 186 (सॉल्ट 30, सुनील नरेन 47, वेंकटेश अय्यर 50, श्रेयस अय्यर नाबाद 39, रिंकू सिंग नाबाद 5, अवांतर 15, यश दयाल 1-46, दागर 1-23, विशाख 1-23).