कोरोना सक्रिय रुग्णसंख्या 31 वर
आणखी 14 जणांना डिस्चार्ज : 221 जण कोरोनामुक्त : कुर्ली नवी वसाहत, कुरंगवणेत कंटेनमेंट झोन
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना वाढीचा वेग पुन्हा मंदावू लागला आहे. सोमवारी नव्याने एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. दुसरीकडे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून सोमवारी जिल्हय़ातील आणखी 14 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यांना डिस्चार्जही देण्यात आला. आतापर्यंत एकूण 221 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत 31 रुग्ण उपचाराखाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी येथे दिली.
जिल्हय़ातील नागरिकांकडून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हय़ाबाहेरून येणाऱया लोकांना वेळीच क्वारंनटाईन केले जात आहे. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे.
सोमवारी आणखी 14 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत आढळलेल्या 258 रुग्णांपैकी 221 कोरोनामुक्त झाले. पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण मुंबईला गेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कोरोना सक्रिय 31 रुग्ण आहेत.
कुर्ली नवी वसाहत, कुरंगवणे येथे कंटेनमेंट झोन
कणकवली तालुक्मयातील कुर्ली नवी वसाहत येथील 500 मीटर परिसर, तर कुरंगवणे येथील गोठणकरवाडी येथेही 300 मीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. दोन्ही कंटेनमेंट झोनमध्ये 26 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे-जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवलीच्या उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 4420
अहवाल प्राप्त झालेले नमुने 4399
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 258
निगेटिव्ह आलेले नमुने 4141
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 21
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 31
अन्य जिल्हय़ात तपासणीसाठी गेलेले रुग्ण 1
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 221
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 51
सोमवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 2998
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 13449
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 45
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 10733
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 2671
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 130958