‘कोकण रेल्वे वाहतूक’ निर्णयास स्थगिती द्यावी!
उमेश गाळवणकर यांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
वार्ताहर / कुडाळ:
कोकणात येणाऱया रेल्वेगाडय़ा सुरू झाल्यास त्यातून परप्रांतातून
येणाऱया प्रवाशांकडून कोरोना विषाणूचा संसर्ग येथे होण्याची शक्मयता असल्याने कोकण
रेल्वे वाहतूक सुरू करण्याच्या निर्णयास सद्यस्थितीत स्थगिती देण्याबाबत आपण शिफारस
करावी, अशी मागणी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी सिंधुदुर्गच्या
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात तसेच देशात
झपाटय़ाने वाढत असून सरकारने 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. राज्यात कोरोनाग्रस्त
रुग्णांची संख्या वाढत असून प्रामुख्याने मुंबईमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या
जास्त आहे. त्यात कोकणातला (रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड) बराचसा कोकणी माणूस नोकरी-व्यवसायानिमित्त
मुंबईस्थित आहे. तसेच काही माणसे कोकणातून मुंबई येथे गेलेली आहेत. ती लॉकडाऊनमुळे
तेथे अडकली आहेत. या सर्वांना कोकणात यायचे आहे. परंतु ती मुंबई ते कोकण प्रवास करताना
त्यात जर चुकून कुणी एखादा कोरोना संसर्ग झालेला असेल आणि त्यामुळे त्याचा संसर्ग इतरांना
झाला, तर त्यामुळे निर्माण होणारी स्थिती भयंकर असेल.
रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये जे कोरोना संशयित मिळाले, त्यांनी मेंगलोर एक्स्प्रेसने प्रवास केल्याची पार्श्वभूमी होती. त्यामुळे या प्रवाशांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. या गोष्टीचा विचार करता लॉकडाऊन कालावधीनंतर कोकण रेल्वे प्रवासी सेवा सुरू केल्यास हे संकट आपण जाणीवपूर्वक ओढवून घेत असल्यासारखे होईल. तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आरोग्य यंत्रणा हे संकट पेलण्यास म्हणावी तेवढी सक्षम नसल्याने या रोगाचा प्रसार झाल्यास ग्रामीण भागातील लोकांना नाहक त्याचा त्रास होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.