कोकणच्या विकासाला चालना मिळणार!
पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास : ‘मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द केला पूर्ण!’
सागरी पर्यटन विकासासाठी 9 हजार 573 कोटींची तरतूद
मेडिकल कॉलेजसाठी 996 कोटी, ‘सिंधुरत्न’ साठी 300 कोटींची तरतूद!
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोकणच्या 540 किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्ग व सागरी पर्यटन विकासासाठी 9 हजार 573 कोटीची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मेडिकल कॉलेजसाठी 996 कोटी, सिंधुरत्न विकास योजनेसाठी 300 कोटी, सिंचनासाठी 301 कोटी, कौशल्य विकाससाठो 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून राज्याच्या अर्थसंकल्पात कोकणच्या विकासाला चालना देणारा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे, अशी माहिती जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
पालकमंत्र्यांनी मंत्रालयातूनच ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे कोकण व राज्याच्या विकासाला चालना देणारा ठरला आहे. गतवषी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱयावर आले असताना सिंधुरत्न विकास योजना जाहीर केली होती. शासकीय मेडिकल कॉलेजही जाहीर केले होते. त्यांनी दिलेला शब्द अर्थसंकल्पातून पूर्ण केला आहे.
पर्यटन विकासासाठी मोठी तरतूद
कोकणच्या 540 किलोमीटर लांबीच्या सागरी किनारपट्टीवरील सागरी महामार्ग व पर्यटन विकासासाठी मोठी आर्थिक तरतूद अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तब्बल 9 हजार 573 कोटीची तरतूद आहे. त्यामुळे कोकणच्या सागरी पर्यटन विकासाला गती येणार आहे. पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हय़ाला त्याचा मोठा फायदा होणार आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी शब्द खरा केला!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेब्रुवारी 2020 मध्ये सिंधुदुर्ग जिल्हय़ात येऊन बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी चांदा ते बांदा या योजनेऐवजी सिंधुरत्न विकास योजना जाहीर केली होती. या योजनेसाठी तीन वर्षांकरिता 300 कोटीची तरतूद केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शब्द खरा केला आहे. सिंधुरत्न विकास योजनेतून बंदर विकास, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय बळकटीकरण अशी विकासात्मक कामे केली जाणार आहेत.
आरोग्याचे सर्व प्रश्न मांडणार!
पालकमंत्री म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी कोविड लॅब मंजूर करताना सिंधुदुर्ग जिल्हय़ात शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करणार, असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे मेडिकल कॉलेज मंजूर करून त्यानंतर अर्थमंत्र्यांनी मेडिकल कॉलेजसाठी 996 कोटीची तरतूद केली आहे. त्यामुळे जिल्हय़ाच्या आरोग्याचे सर्व प्रश्न मार्गी लागणार आहेत. सिंचन विकासासाठी सुद्धा 301 कोटीची तरतूद केली आहे. कौशल्य विकासासाठी मालवणच्या पॉलिटेक्निकलसाठी 25 कोटीची तरतूद केली आहे. जिल्हा वार्षिक आराखडय़ासाठी 170 कोटी तरतूद केली आहे.
विद्यापीठ उपकेंद्रासाठी आठ दिवसात जागा निश्चिती
सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण विकासासाठी आवश्यक निधी दिला जाणार आहे. तसेच ‘फायर फायटर’ लवकरच देण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सिंधुदुर्ग जिल्हय़ात होण्यासाठी आठ दिवसांत जागा निश्चित केली जाणार आहे. सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवनासाठी एक कोटी 40 लाख रुपये निधीसुद्धा लवकरच दिला जाणार आहे. पोंभुर्ले गावातील बाळशास्त्राr जांभेकर स्मारकासाठी अधिकची तरतूद केली जाणार आहे. श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळासाठी 50 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. आपल्या उच्च व तंत्र शिक्षण विभागालाही 1310 कोटीची तरतूद तसेच विद्यार्थ्यांच्या फीसाठी आठ हजार कोटींची तरतूद केल्याची माहिती पालकमंत्री सामंत यांनी दिली. वाळू दर कमी करण्याबाबत महसूल खात्याकडे प्रस्ताव गेला असून अधिवेशन संपताच वाळू दर कमी करून मिळतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
महसूलमधील भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱयांवर कारवाईचे आश्वासन
आमदार वैभव नाईक यांनी महसूलमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला होता. त्याची चौकशी होणार असून सर्व भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱयांवर कारवाई केली जाणार आहे. कुडाळ प्रांताधिकाऱयांचीही कोकण आयुक्तांमार्फत चौकशी सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.