कोईम्बतूर बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएचे तीन राज्यात छापे
कर्नाटकसह तामिळनाडू, केरळमधील 60 ठिकाणी छापे, आयएसआयएस कनेक्शन उघड
@ वृत्तसंस्था/ चेन्नई
कोईम्बतूर कार सिलेंडर स्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 3 राज्यांमध्ये छापे टाकले. तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमधील 60 हून अधिक ठिकाणी संशयित आयएसआयएस समर्थकांच्या संबंधात तपास संस्थेने हे छापे टाकले आहेत. तीन राज्यांपैकी कर्नाटकात सर्वाधिक 45 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. एनआयएला आयएसशी संबंधित काही संशयितांची माहिती प्राप्त झाल्यानंतर बुधवारी वेगवेगळय़ा भागात एकाचवेळी धडक कारवाई करण्यात आली. संबंधित लोकांना व्हिडिओच्या माध्यमातून कट्टरपंथी बनवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
कोईम्बतूर कार स्फोटात ‘आयएसआयएस’चे कनेक्शन सापडले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 109 वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये इस्लामिक विचारधारेशी संबंधित दस्तावेजाचाही समावेश होता, असे तपासादरम्यान एनआयएने सांगितले. गेल्यावषी 23 ऑक्टोबर रोजी कोईम्बतूर येथील संगमेश्वर मंदिराजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये स्फोट झाला होता. त्यात कारचा मालक जेमिशा मुबीन याचा मृत्यू झाला होता. स्फोटाच्या वेळी तो कारमध्येच होता. ‘आयएसआयएस’च्या विचारसरणीने मुबीनला कट्टरतावादी बनवले. मात्र, स्फोटके हाताळण्याचे योग्य प्रशिक्षण न मिळाल्याने त्याचा या स्फोटात मृत्यू झाला होता. तपास संस्थेच्या म्हणण्यानुसार, स्फोटाच्या वेळी मुबीनच्या कारमध्ये दोन एलपीजी सिलिंडर होते, त्यापैकी एकाचा स्फोट झाला. दुसरा स्फोट झाला असता तर मंदिर आणि आजूबाजूच्या अनेक घरांचे नुकसान झाले असते.
आतापर्यंत 5 जणांना अटक
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने मुबीनच्या 5 साथीदारांनाही अटक केली होती. या सर्वांना यूएपीए अंतर्गत 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मोहम्मद थलका, मोहम्मद असरुद्दीन, मोहम्मद रियाझ, फिरोज इस्माईल आणि मोहम्मद नवाज अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने आपण ‘आयएसआयएस’च्या संपर्कात असल्याचे कबूल केले होते. 21 एप्रिल 2019 रोजी श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेतील आरोपींना आपण भेटल्याची जबानी त्याने दिली होती.
स्फोटकांची ऑनलाईन ऑर्डर
घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेले साहित्य कमी-स्फोटक बॉम्ब बनवण्यासाठी वापरले जात होते, असे कोईम्बतूरचे पोलीस आयुक्त बालकृष्णन यांनी बुधवारी सांगितले. मुबीनच्या घराची तपासणी केली असता त्याच्या घराबाहेर ऍमेझॉनचे काही रिकामे बॉक्स सापडले. घरातून 75 किलो स्फोटके जप्त झाल्यामुळे आणखी बॉम्ब बनवण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट झाला होता. मुबीनच्या घरातून पोटॅशियम नायटेट, चारकोल, ऍल्युमिनियम पावडर आणि सल्फर जप्त करण्यात आले होते.