केरळमध्ये तालिबान समर्थकांमध्ये वाढ
माकपच्या दस्तऐवजांमध्येच नमूद- सुशिक्षित महिला ठरत आहेत लक्ष्य
वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम
केरळमध्ये तालिबानसाठीचे समर्थन वाढत चालल्याचा खुलासा केरळच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एका अंतर्गत दस्तऐवजातून झाला आहे. या दस्तऐवजांचे माकपने स्वतःच्या कॅडरांमध्ये वाटप केले होते. केरळमधील ‘तालिबान समर्थनार्थ भावना’ वाढल्याने माकप चिंतेत असल्याचे या दस्तऐवजातून निदर्शनास येते.
या दस्तऐवजानुसार जमात-ए-इस्लामी हिंद सांप्रदायिक भावनांना भडकविण्याचे काम करत आहे. जमात केरळमध्ये स्वतःच्या अजेंडय़ाला पुढे नेण्यासाठी स्वतःची प्रकाशने आणि सोशल मीडियाचा वापर करत असल्याचा दावा आहे. इस्लामिक राज्य प्रस्थापित करण्याचे लक्ष्य जमातचे आहे. स्वतःच्या विचारांना जमात मुस्लीम समुदायासह अन्य समुदायांमध्येही फैलावत आहे. ख्रिश्चनांना मुस्लिमांच्या विरोधात चिथावणी देण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा देखील या दस्तऐवजांमध्ये करण्यात आला आहे.
2011 च्या जनगणनेनुसार केरळची 26 टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे. केरळमध्ये तालिबानच्या समर्थनार्थ चर्चा होणे हा गंभीर चिंतेचा विषय आहे. तर मुस्लीम समुदायासमवेत जगभरात तालिबानची निंदा होत असताना केरळमधील हा प्रकार चिंताजनक असल्याचे दस्तऐवजात म्हटले गेले आहे. सुशिक्षित महिलांना या विचारसरणीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.
माकपने जमातच्या विरोधात स्वतःच्या संघटना आणि कार्यकर्त्यांना एकजूट होण्याची सूचना केली आहे. संघ परिवाराच्या कार्यक्रमांमुळे अल्पसंख्याकांमध्sय सांप्रदायिक भावना वाढत असल्याचेही दस्तऐवजांमध्ये म्हटले गेले आहे. माकपकडून केरळमधील वाढत्या कटरतावादाच्या विरोधात अशाप्रकारची पावले उचलली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
संघाला ठरविले जबाबदार
पक्षाच्या दस्तऐवजात सांप्रदायिक आणि कट्टरतावादी शक्तींबद्दल सतर्क करण्यात आले आहे. तरुणाई आणि विद्यार्थ्यांना ‘कट्टरतावादी आणि दहशतवादी कारवायां’च्या दिशेने जाण्याच्या स्थितीला संघपरिवाराच्या हालचालींशी जोडून पाहण्यात यावे असे माकप पॉलिट ब्युरोचे सदस्य एम. ए. बेबी यांनी म्हटले आहे. कट्टरतावादाच्या कारवाया संघाच्या कार्यक्रमांच्या प्रत्युत्तरादाखल होत आहेत. केरळमध्ये जमात-ए-इस्लामी कट्टरतावादी शक्तींकरता अनुकूल वातावरण तयार करत असल्याचे बेबी यांनी सांगितले आहे.
जमातने फेटाळले आरोप
तर जमात-ए-इस्लामी हिंदने हे आरोप आणि दावे फेटाळून लावले आहेत. जमात-ए-इस्लामिक हिंदविषयी चुकीची धारणा तयार करण्याचा प्रयत्न राजकीय हतबलता किंवा राजकीय लाभासाठी होत आहे. सांप्रदायिक आणि विभाजनकारी प्रवृत्तींच्या विरोधात जमातचा अजेंडा राहिला असल्याचा युक्तिवाद जमातचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहम्मद सलीम इंजीनियर यांनी केला आहे.