कॅनडा पोलिसांचे कारस्थान, हिंदूंच्या निदर्शनांना ठरविले अवैध
खलिस्तान समर्थकांच्या हल्ल्याबद्दल नरमाईची भूमिका : हिंदू समुदायाकडून संताप
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडातील ब्रॅम्पटनमध्ये हिंदू मंदिरावर खलिस्तान समर्थकांकडून झालेल्या हल्ल्यानंतर तणावपूर्ण असलेले द्विपक्षीय संबंध अधिकच बिघडत चालले आहेत. खलिस्तान समर्थकांना कॅनडाच्या सरकारकडून अभय मिळत असताना आता तेथील पोलिसांची कारस्थान समोर आले आहे. कॅनडा पोलिसांनी हिंदूंच्या विरोधात फर्मान जारी केले आहे. या फर्मानीमध्ये हल्ल्याच्या विरोधात हिंदूंनी केलेल्या निदर्शनांना अवैध ठरविण्यात आले आहे. निदर्शनांमध्ये शस्त्रs दिसून आल्याचे म्हणत यात सामील लोकांना अटक होऊ शकते असे कॅनडाच्या पोलिसांनी म्हटले आहे.
ब्रॅम्पटन येथील हिंदू मंदिरावर खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला होता. या हल्ल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच खलिस्तान समर्थकांच्या टोळक्या सामील पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या तिन्ही आरोपींना ओंटारियो कोर्ट ऑफ जस्टिससमोर हजर केले जाणार आहे. तर आरोपींमध्ये 23 वर्षीय विकास आणि 31 वर्षीय अमृतपाल सिंह सामील ओ. याप्रकरणी चौथ्या इसमाला अटक करण्यात आली होती, परंतु नंतर त्याची मुक्तता करण्यात आली.
कॅनडात कट्टरवादी घटकांना आसरा
कॅनडासोबत सुरु असलेल्या तणावादरम्यान विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी कॅनडाने कुठलीही माहिती न देता आरोप करण्याचा एक पॅटर्न विकसित केल्याची टीका केली आहे. कॅनडात भारतीय मुत्सद्द्यांवर नजर ठेवली जात असून हा प्रकार अस्वीकारार्ह आहे. कॅनडात कट्टरवादी शक्तींना राजकारणात स्थान दिले जात आहे. हिंदू लोकांवर कॅनडात झालेल्या हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली असल्याचे जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियातील पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे.
हिंदू मंदिरावर झाला होता हल्ला
कॅनडातील ब्रॅम्पटन येथे हिंदू सभा मंदिरात भारतीय दूतावासाने कॉन्स्युलेट कॅम्पचे आयोजन केले होते. या कॅम्पदरम्यान खलिस्तान समर्थकांनी भारतीयांवर हल्ले केले होते. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर कॅनडात राहत असलेल्या हिंदू तसेच अन्य अल्पसंख्याकांनी स्वत:च्या सुरक्षेवरून चिंता व्यक्त केली आहे. कॅनडातील विरोधी पक्ष नेत्याने हा प्रकार अस्वीकारार्ह असल्याचे म्हटले आहे. तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हल्ल्याची निंदा करत दोषींच्या विरोधात कारवाई केली जाणार असल्याचा दावा केला आहे.