For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कृष्णभक्त काळालासुद्धा भिक घालत नाहीत

06:03 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
कृष्णभक्त काळालासुद्धा  भिक घालत नाहीत
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

नाथ महाराज म्हणाले, ज्यांनी ज्यांनी ही कृष्णकीर्ती इतरांना सांगितली त्यांचाही उद्धार झाला. तसेच येथून पुढे जे ह्या कृष्णकीर्तीचा महिमा इतरांना वर्णन करून सांगतील त्यांना परमभक्तीचा लाभ होऊन त्यांचा उद्धार होईल. ज्याला ही चौथी भक्ती लाभते म्हणजे ज्याचे देवाबरोबर अद्वैत तयार होते, त्याला परमहंसाची श्रीकृष्णगती प्राप्त होते. त्या भक्तीला पराभक्ती असे म्हणतात. श्रीकृष्णाच्या कीर्तीचे महिमान सांगितल्याने त्यांना विषयांपासून विरक्ती सहजी लाभते. त्यासाठी त्यांना विशेष काही प्रयत्न करावे लागत नाहीत. एव्हढेच नव्हे तर शमदमादि संपत्ती त्यांचे पाय चुरू लागते. जे श्रीकृष्ण कीर्तीचा अखंड जप करतात त्यांच्याजवळ श्रीकृष्ण सतत राहतात. ह्या चौथ्या भक्तीत पुजला जाणारा आणि पूजा करणारा स्वत: श्रीकृष्णच असतो. श्रीकृष्ण भक्तांपासून अर्धक्षणही वेगळा राहू शकत नाही. देव आणि भक्ताचे अद्वैत तयार होते. अशावेळी भक्त कृष्णरूप झालेला असल्याने त्याची श्रीकृष्णापेक्षा वेगळी जात, गोत नसते. ह्याप्रमाणे ज्याला चौथी भक्ती लाभते त्याला परमहंसाची श्रीकृष्णगती प्राप्त होते. श्रीकृष्णकीर्तीचे वर्णन करता करता ते स्वत: कृष्णस्वरूप होतात. ज्याप्रमाणे परीस लोखंडाला लावला की, त्याचे सोने होते आणि नंतर त्याचे पुन्हा कधीही लोखंडात रुपांतर होत नाही त्याप्रमाणे एकदा श्रीकृष्णकीर्तीचे वर्णन करून कृष्णस्वरूप प्राप्त झाले की, पुन्हा त्यात बदल होत नाही. श्रीकृष्णकीर्तीचे एकेक अक्षर हे चारही वेदांच्या जिव्हाळा आहे, ते सर्व शास्त्रांचे परम सार आहे. नारायणाचा आठवा अवतार श्रीकृष्ण पूर्णावतार असल्याने त्याला वेदांचे जन्मस्थान मानतात. सर्व शास्त्रांचा, अंतिम शब्द म्हणजे श्रीकृष्ण होय. सहाही दर्शने त्याच्या पायाशी येऊन थांबतात. परमेश्वराचे अनंत अवतार जरी झाले तरी श्रीकृष्णावतार ज्ञानघन असल्याने भवबंधनच्छेदक असलेले त्याचे चरित्र अतिपावन समजले जाते. त्या श्रीकृष्णाची कृष्णकीर्ती जे आदराने आठवत राहतील आणि त्यावर चित्तात चिंतन करत राहतील त्यांच्या भवबंधनाची समाप्ती होते. श्रीकृष्ण कीर्तीमध्ये वैभव, वैराग्य ह्या दोन्हीचा समावेश आहे. ज्याच्या मनामध्ये श्रीकृष्णकीर्ती वसत असते ते कळिकाळालासुद्धा भिक घालत नाहीत. ते काळालासुद्धा भीत नाहीत म्हणजे त्यांना मृत्यू येत नाही असे नाही परंतु त्यांच्या देहाच्या समाप्तीनंतर एकतर ते हरिभजन चालू ठेवण्यासाठी म्हणजे मुक्ती नंतरची भक्ती करण्यासाठी वैकुंठात तरी जातात किंवा त्यांचे काही जुने प्रारब्ध राहिले असेल तर ते भोगण्यासाठी पुन्हा कुणातरी हरिभक्ताच्या घरी जन्म घेतात. त्यामुळे त्यांची हरीभक्ती पुढे चालूच राहते. देहाच्या मृत्यूमुळे त्यांच्या हरीभजनात कसलाही खंड पडत नाही. मृत्यूला कशाला जुमानतील? श्रीकृष्णमूर्तीचे महात्म्य एव्हढे अगाध आहे की, अगदी आळसात दिवस काढणाऱ्या माणसाने जर त्यांची आठवण काढली तर त्यांची सर्वच्यासर्व पापे भस्म होतात. हे लक्षात घेऊनच आपल्या मुलांची नावे माणसे राम, कृष्ण, हरी, दामोदर अशी ठेवतात. त्यांना हाका मारताना आपोआपच देवाचे नाव मुखी येते. त्यामुळे सहज जाता जाता लोक पुण्य गाठी बांधतात आणि उद्धरून जातात. असे सहजी नामस्मरण करून जर इतके मोठे पुण्य पदरी पडत असेल तर जे सदा श्रीकृष्णकीर्ती गातात त्यांना काय काय आणि किती मिळत असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. नाथमहाराज म्हणतात सदैव कृष्णकीर्ती गात फिरणाऱ्या मंडळींना चारही मुक्ती आंदण म्हणून मिळतात आणि ते त्यांचा त्यांना हवा तसा वापर करू शकतात. श्रीकृष्णकीर्तीचे महात्म्यच असे परमपावन आहे की, त्यातील एक एक अक्षर महापातकाच्या सांभाराचे निर्दालन करते.

क्रमश:

Advertisement

Advertisement
Tags :

.