कूचबिहारमधील हिंसाचारावरून राजकारण
ममता बॅनर्जी यांच्याकडून केंद्र सरकार लक्ष्य
वृत्तसंस्था / कोलकाता
कूचबिहारमध्ये मतदानादरम्यान झालेल्या हिंसाचारावरून पश्चिम बंगालमध्ये राजकारण पेटले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसह हे सरकारही असमर्थ आहे. बंगालवर कब्जा करण्याच्या उद्देशाने भाजपचे नेते येथे येत आहेत. सर्वप्रथम भाजप सुरक्षा दलांच्या माध्यमातून लोकांचा जीव घेत आहे, त्यानंतर सुरक्षा दलांना क्लीनचिट देत असून हा नरसंहाराचा प्रकार असल्याचा आरोप ममतांनी केला आहे.
ममतांच्या या आरोपांवर बंगालच्या शांतिपूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कूचबिहारच्या घटनेचे राजकीयकरण केले जात असून हा प्रकार अत्यंत दुःखद आहे. संबंधित भाग असलेल्या सीतलकुची मतदारसंघात ममतादीदींनी सुरक्षा दलांना घेरून त्यांच्यावर हल्ला करण्याची सूचना तृणमूल समर्थकांना केली होती. ममतांचे हे भाषण 4 लोकांच्या मृत्यूस जबाबदार नाही का? या भाषणासाठी ममतांनी बंगालच्या जनतेची माफी मागायला हवी असे म्हणत शाह यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षांना लक्ष्य केले आहे.
ममतांकडून तुष्टीकरण
हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू होऊनही ममता दीदी केवळ 4 जणांना श्रद्धांजली वाहतात. मतदान केंद्रावर सकाळी आनंद वर्मन याची गुंडांकडून हत्या करण्यात आली होती. मात्र त्यांना आनंद वर्मनच्या मृत्यूशी कुठलेच देणंघेणं नाही. मृत्यूप्रकरणीही ममता बॅनर्जी तुष्टीकरण आणि मतांचे राजकारण करत आहेत. ममतांनी बंगालच्या राजकारणाला अत्यंत खालच्या पातळीवर नेल्याचे हे एक उदाहरण असल्याचे शाह म्हणाले.
3 दिवसांनी करणार दौरा
निवडणूक आयोगाने मॉडेल कोड ऑफ कंडक्टचे (एमसीसी) नाव बदलून मोदी कोड ऑफ कंडक्ट करावे असे म्हणत ममतांनी ईसीला लक्ष्य केले आहे. भाजपने पूर्ण जोर लावला तरीही या जगात मला माझ्या लोकांचे दुःख वाटून घेण्यापासून रोखू शकत नाही. कूचबिहारमध्ये 3 दिवसांसाठी स्वतःच्या बंधू आणि भगिनींना भेटण्यापासून रोखू शकता, पण चौथ्या दिवशी मी तेथे पोहोचणार असल्याचा दावा ममतादीदींनी केला आहे.
निवडणूक आयोगाकडून बंदी
बंगालमध्ये चौथ्या टप्प्यासाठी शनिवारी झालेल्या मतदानादरम्यान कूचबिहारच्या सितालकुचीमध्ये सीआयएसएफच्या बचावात्मक कारवाईदरम्यानच्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भागातील तणावपूर्ण स्थिती पाहता निवडणूक आयोगाने तेथे नेत्यांच्या प्रवेशावर 72 तासांची बंदी घातली आहे. याचबरोबर पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या 72 तासांपूर्वीच प्रचार बंद करण्याचा आदेशही आयोगाने दिला आहे.