For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काही घटना घडल्या तरी संबंध सुदृढच !

06:38 AM Dec 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
काही घटना घडल्या तरी संबंध सुदृढच
Advertisement

भारत-अमेरिका भागिदारीसंबंधी पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, पन्नू प्रकरणी प्रथमच व्यक्तव्य

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

काही घटना घडल्या तरी भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध दृढच राहतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी बुधवारी प्रथमच अमेरिकेतील गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येच्या प्रयत्नासंबंधी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. एका भारतीय अधिकाऱ्याने पन्नू याची हत्या करण्यासाठी मारेकरी पाठविण्याचा प्रयत्न केला होता, असा अमेरिकेचा आरोप आहे. भारत-अमेरिका संबंधांमध्येही त्यामुळे अडथळा येऊ शकतो, असे बोलले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत आपली प्रतिक्रिया दिली.

Advertisement

अमेरिकेने या प्रकरणी भारताला पुरावे दिल्यास भारत त्याचा गांभीर्याने विचार करणार आहे. इतर देशांमध्ये असे प्रकार करण्याचे भारताचे धोरण नाही. मात्र, कोणी तसा प्रकार केलाच असेल, तर भारत त्यासंबंधी निर्णय घेऊन योग्य ती पावले उचलणार आहे. तथापि, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंसाचार आणि लोकांना भयभीत करणे अशी कृत्ये घडत आहेत, या वस्तुस्थितीही गंभीर जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मुलाखतीत स्पष्ट केली.

दहशतवाद रोखा

भारतात दहशतवादी हिंसाचार घडविण्याचे प्रयत्न अनेक दहशतवादी गट भारताबाहेर राहून करीत आहेत. संबंधित देशांना भारताने अनेकदा या गटांच्या हालचालींसंदर्भात सप्रमाण माहिती दिली आहे. या संदर्भात भारताला तीव्र चिंता वाटत आहे. दहशतवाद रोखणे हे साऱ्यांचेच कर्तव्य आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. सध्या कॅनडा आणि अमेरिकेत शीख दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या असून भारताने वेळोवेळी संबंधित देशांकडे माहिती पाठविली आहे.

प्रकरण काय आहे?

निखील गुप्ता नामक एका भारतीयाला झेक प्रजासत्ताक या देशात अटक करण्यात आली होती. त्याने एका भारतीय अधिकाऱ्याच्या सांगण्यावरुन एका मारेकऱ्याला 1 लाख डॉलर्स देऊन त्याच्याकरवी गुरपतवंतसिंग पन्नू याची हत्या घडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. अमेरिकेने ही बाब भारताकडे स्पष्ट केली असून भारताने चौकशीचे आश्वासन दिले आहे. मात्र, या घटनेमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये काही अडचण आल्याचे बोलले जाते.

तसे काही होणार नाही

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही भारतावर हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत सहभाग असल्याचा आरोप जाहीररित्या केला होता. तथापि, भारताने तो फेटाळत कॅनडाला आरोप सिद्ध करण्याचे आणि माहिती पुरविण्याचे आवाहन केले होते. तथापि, अद्यापही कॅनडाने पुरावे दिलेले नाहीत. त्यामुळे ते प्रकरण आता बरेच शांत झालेले आहे. अमेरिकेच्या आरोपांसंबंधी मात्र, भारताची भूमिका वेगळी आहे. अमेरिकेने माहिती दिल्यास चौकशी करण्यास अनुकूल असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. इतके दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर विधान केले नव्हते. मात्र, कॅनडासंबंधी जे घडले ते अमेरिकेसोबतच्या संबंधांविषयी घडणार नाही. दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होतील, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

दहशतवादाला खतपाणी

अमेरिका आणि कॅनडातील काही व्यक्ती आणि संघटना भारताच्या पंजाब राज्याला भारतापासून तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. 80 च्या दशकात पंजाबमध्ये या प्रश्नावरून फार मोठा हिंसाचार झाला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्याही त्यांच्याच शीख सुरक्षारक्षकांनी केली होती. आजही खलिस्तानवादी दहशतवादी अमेरिका आणि कॅनडात वास्तव्य करुन भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.

Advertisement
Tags :

.