काशीमध्ये तमिळ संगममला प्रारंभ
राहुल गांधींच्या ‘मिशन साउथ’ला भाजपचे प्रत्युत्तर ठरणार
वृत्तसंस्था /वाराणसी
ऐतिहासिक नगरी काशीमध्ये गुरुवारपासून भारताच्या दोन पौराणिक संस्कृतींच्या मिलनाची साक्षीदार ठरणार आहे. भारतीय सनातन संस्कृतीचे दोन पौराणिक केंद्र विश्वेश्वर आणि रामेश्वराच्या मिलनासाठी ही नगरी सज्ज आहे. एक महिन्यापर्यंत चालणाऱया काशी-तमिळ संगमममध्ये यावेळी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ची थीम आहे. याच थीमवर काशीला सजविण्यात आले आहे. यावेळी उत्तर-दक्षिणेतील संस्कृती, परंपरा, खाद्यसंस्कृती आणि शैलींचे संगम होण्यासह तामिळनाडूच्या 12 प्रमुख मठांच्या महंताचा गौरव करण्यात येणार आहे. याचबरोबर 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करत असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘मिशन दक्षिण’ला याद्वारे भाजपकडून प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे मानले जातेय.
पंतप्रधान अन् वाराणसीचे खासदार नरेंद्र मोदी देखील देशाच्या दोन संस्कृतींच्या संगम सोहळय़ात सामील होणार आहेत. काशी हिंदू विद्यापीठच्या एम्पीथिएटर मैदानात 19 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत तमिळ संगममचे उद्घाटन होणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीकरता राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा करत आहेत, तर दुसरीकडे भाजपनेही दक्षिणेतील राज्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. याचकरता भाजपने कुठलीही यात्रा नव्हे तर तमिळ भाषिकांना उत्तर भारतीय संस्कृतीशी ओळख करून देण्याचे नियोजन केले आहे.
सुमारे एक महिन्यापर्यंत 3 हजारांच्या आसपास तमिळ भाषिक लोक काशीत येऊन स्वतःच्या तमिळ संस्कृतीला काशीच्या लोकांसोबत सादर करणार आहेत. या सोहळय़ात पंतप्रधान मोदी सहभागी होणार असल्याने प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. पंतप्रधान मोदींची येथे जाहीरसभाही होणार आहे. 17 नोव्हेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत काशीमध्ये तमिळ भाषिक लोक ठाण मांडणार आहेत. एक महिन्यापर्यंत तामिळनाडूच्या विविध भागातील लोक स्वतःची कला तसेच संस्कृतीची ओळख काशीवासीयांना करून देणार आहेत.
तामिळनाडूशी निगडित खाद्यसंस्कृती, हस्तकला, तेथील लघू उद्योगांची उत्पादने, कलासंस्कृतीशी निगडित स्टॉलस लावण्यात आले आहे. या सोहळय़ात काशी तसेच अन्य ठिकाणचे लोक तामिळनाडूच्या सामाजिक अन् सांस्कृतिक घडामोडींबद्दल माहिती मिळवू शकणार आहेत. येथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहेत. दररोज 200-250 तमिळ भाषिक वाराणसीमध्ये येणार आहेत. हे तमिळभाषिक वाराणसीत काशी विश्वनाथ धाम, कालभैरव, केदारनाथ मंदिरासह सारनाथचे भ्रमण करणार आहेत. काशीमधील विकासकामे पाहिल्यावर हे लोक प्रयागराज आणि अयोध्येला रवाना होतील. तमिळ भाषिकांमध्ये विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, महिलांचाही समावेश असणार आहे. काशीशी तामिळनाडूच्या राहिलेल्या संबंधांवर चर्चेसह दोन्ही स्थानांमधील समानता तसेच महत्त्व दर्शविण्यात येणार आहे.
या आयोजनाबद्दल काशीवासीयांसह येथे अनेक पिढय़ांपासून वसलेल्या तमिळ कुटुंबांमध्ये मोठा उत्साह आहे. पाहुण्यांना काशीत वसलेल्या मिनी तामिळनाडूलाही पाहता येणार आहे. तामिळनाडूतून आलेल्या कलाकारांसह विविध ठिकाणचे कलाकार येथे स्वतःच्या कलेचे सादरीकरण करणार आहेत.
काशीशी कन्याकुमारीचे नाते
काशी-तमिळ संगमममध्ये येणारे पाहुणे हे काशीच्या हनुमान घाट भागात वसलेल्या तमिळ परिवारांशी संवाद साधतील. काशीमध्ये सुमारे 200 तमिळ कुटुंबांचे वास्तव्य आहे. तामिळनाडूच्या नाट्कोट्टई क्षेत्रमकडून काशी विश्वनाथ मंदिरात 210 वर्षांपासून 3 आरत्या करण्यात येतात. या आरतींसाठी भस्म आणि चंदन तामिळनाडूतूनच मागविले जाते.