For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेस का हात भाजप के साथ?

06:33 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेस का हात भाजप के साथ
Advertisement

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना ऊत आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या प्रादेशिक पक्षांत फुट पाडल्यानंतर आता भाजपने आपला मोर्चा काँग्रेसकडे वळविला. सोमवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यासह आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भुकंप झाला आहे.

Advertisement

चव्हाण हे आपल्या समर्थक आमदारांसह लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे चव्हाण यांच्यासोबत काही आमदारांनीदेखील राजीनामे तयार ठेवले आहेत. तर या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यातील चाणक्य अशी ओळख असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगे-आगे देखो होता है क्या? असे सुचक वक्तव्य केल्याने, विरोधी गटात अस्वस्थता निर्माण झाली झाली आहे. कारण आणखी किती आमदार भाजपमध्ये जाणार हे येणाऱ्या काही काळातच समजेल. मात्र राज्यातील कॉंग्रेसमध्ये मोठी फुट पडणार असल्याची चिन्हे असल्याने काँग्रेस का हात भाजप के साथ असणार हे निश्चित अशी चर्चा सुऊ झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते, त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यास सुरूवात केली असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुट पाडल्यानंतर आता भाजपच्या निशाण्यावर काँग्रेस असून काँग्रेसमध्ये फुट पाडून काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, काही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत तर काही भाजपमध्ये येत्या काही दिवसात पक्ष प्रवेश करण्याची शक्यता असून महाराष्ट्रात भाजपने दिलेला लोकसभा 45 प्लसचा दावा पूर्ण करण्यासाठी भाजपने जोरदार कंबर कसल्याचे दिसत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याच अशोक चव्हाणांना ज्या आदर्श प्रकरणामुळे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, त्यावेळी भाजपच चव्हाणांच्या विरोधात आक्रमक होती तर 2009 ला विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्रातील अनेक आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये अशोकपर्व नावाची पेड न्युज पुरवणी दिली होती. अशोकपर्व पुरवणीनंतरच त्यांच्या राजकीय प्रतिमेला धक्का बसण्यास सुरूवात झाली. 2010 भारतातील संरक्षण मंत्रालयातील युद्धातील विधवांच्या व कर्मच़ाऱ्यांच्या कल्याणासाठी मुंबईतील कुलाबा येथे बांधलेल्या 31 मजली आदर्श सोसायटीत असलेल्या तीन फ्लॅट्समुळे

मा. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. आदर्श प्रकरणानंतर चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीला जो ब्रेक लागला तो आजतागायत.

Advertisement

मराठवाडा हा काँग्रेसचा पारंपारीक गड मानला जात होता, राज्याच्या राजकारणात पिता पुत्र मुख्यमंत्री झालेले एकमेव उदाहरण म्हणजे शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण. काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणांना मानणारा स्वत:चा गट आहे. 2014 च्या मोदी आणि भाजपच्या लाटेत राज्यात काँग्रेसचे केवळ 2 खासदार आले होते, ते हिंगोली येथून राजीव सातव तर स्वत: अशोक चव्हाण हे नांदेड येथून, मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांचा पराभव केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना अशोक चव्हाणांनी काँग्रेसमध्ये आपले कोणी ऐकत नाही मला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावासा वाटतो असे एका कार्यकर्त्यासोबत केलेले फोन संभाषण चांगलेच व्हायरल झाले होते. 1986 पासून काँग्रेस पक्षातून आपल्या राजकारणाची सुरूवात करणाऱ्या चव्हाण यांनी लोकसभेचा खासदार, विधानसभा आणि विधानपरिषद आमदार राज्य सरकारच्या विविध खात्याचे मंत्री ते मुख्यमंत्री असा प्रवास केला. विशेष म्हणजे काँग्रेसचा बॅडपॅच असताना देखील 2014 ला ते खासदार तर 2019 ला आमदार म्हणून निवडून आले. काँग्रेस राजवटीच्या काळात सतत सत्तेत असलेल्या चव्हाण यांना विरोधीपक्षात राहणेच अवघड जात होते, त्यामुळे गेल्या नऊ वर्षात भाजप सरकारच्या विरोधात ना अधिवेशन काळात ते कधी आक्रमक झाल्याचे दिसले ना कधी रस्त्यावर, आदर्श घोटाळ्यामुळे चव्हाण यांचे हात कायमच दगडाखाली होते. एकनाथ शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी अशोक चव्हाणांसह 9 आमदार गैरहजर राहीले होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या चव्हाण यांच्या भूमिकेबाबत गेल्या अडीच वर्षात सतत काही ना काही शंका उपस्थित केली जात होती तर भाजपकडूनदेखील काँग्रेसचा एक मोठा गट फुटणार असा दावा वारंवार केला जात होता. त्याला चव्हाण यांच्या राजीनाम्याने दुजोरा मिळाला असून आता चव्हाण हे आपल्या समर्थक आमदारांसह जर भाजपमध्ये गेल्यास मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी नंतर काँग्रेसला हा सर्वात मोठा धक्का असणार आहे.

महाआघाडीच्या जागा वाटपावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने केलेल्या आकड्यांवर आक्षेप घेताना काँग्रेस नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीची आता ती ताकद राहीली नाही असे बोलणाऱ्या काँग्रेस नेत्यांसमोर आता काँग्रेसचे डॅमेज कंट्रोल रोखणे हेच मोठे आव्हान सध्या तरी असणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा विरोधीपक्ष नेते दोन्ही पदे असणाऱ्या काँग्रेसच्या विदर्भातील नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यात सुप्त संघर्ष आहे. बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष पदावऊन गेल्यानंतर पटोले यांचा गट सक्रिय झाला. भाजप आणि शिवसेना सरकारच्या विरोधात ज्यांनी 2014 पासून आक्रमक भुमिका मांडली ते प्रवक्ते सचिन सावंत आज कुठे आहेत माहीत नाही, बाळासाहेब थोरात हे नगरच्या बाहेर बघत नाही. पृथ्वीराज चव्हाणांचा स्वभाव बघता त्यांना कोणी सिरीयस घेत नाही तर सतेज पाटील हे अधिवेशन काळातच गटनेते म्हणून सक्रिय दिसतात, विलासराव देशमुखांचे दोन्ही आमदार पुत्र असलेले अमित आणि धीरज हे विधानभवनाच्या पायऱ्यांवर कधी आंदोलन करताना दिसले नाहीत. केवळ घराणेशाहीच्या राजकारणाने काँग्रेस संपवली. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत यांना उमेदवारी देण्यासाठी काँग्रेसने सुनिल देशमुखांसारख्या चांगल्या नेत्याचा बळी घेतला. त्यामुळे अशा कीती तरी नेत्यांचा बळी काँग्रेसच्या घराणेशाही राजकारणारने घेतला. सध्या विधानसभेत काँग्रेसकडे विरोधीपक्ष नेते पद असले तरी ते केवळ अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे अन्यथा विधीमंडळातील कोणतेच पद काँग्रेसला मिळाले नसते. इतकी नाचक्की कधी काँग्रेसची झाली नव्हती. काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख यांना काँग्रेसने पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे निलंबित केले होते, तेव्हा विलासरावांनी दिलेली प्रतिक्रिया खुप बोलकी होती. विलासराव तेव्हा म्हणाले होते, मला काँग्रेसमधून काढले मात्र माझ्या रक्तातील काँग्रेस कोण काढणार आणि आताच्या राजकारण्यांच्या रक्तातील काँग्रेस गेली कुठे? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

Advertisement
Tags :

.