कळणेवासीयांना आश्वासने नको, कृती हवी!
कळणेवासीय आज जात्यात, तर अन्य गावे सुपात : लढय़ाला हवी सर्वांचीच साथ : उद्याचा मोठा धोका रोखणे अजूनही हाती
तेजस देसाई / दोडामार्ग:
एकदा एक पक्षी चोचीने समुद्रातील पाणी बाहेर काढत होता. दुसऱया पक्षाने विचारलं, भाऊ तू हे काय करीत आहेस? पहिला पक्षी बोलला, या समुद्राने माझी पिल्लं बुडवलीत. आता तर मी या समुद्राला सुकवूनच टाकतो. हे ऐकून दुसरा पक्षी बोलला, अरे, तुझ्याकडून कसा काय सुकेल समुद्र? तू एवढासा जीव अन् समुद्र एवढा विशाल. त्यावर पहिला पक्षी बोलला, दादा! द्यायची तर साथ दे, सल्ले नकोत. हे ऐकून दुसरा पक्षीही त्याला साथ देऊ लागला. असे हजारो पक्षी येत गेले व दुसऱयांना सांगत गेले की, सल्ले नकोत साथ पाहिजे. हे पाहून विष्णूदेवाचं वाहन गरुडही या कामासाठी निघाला. विष्णू देव म्हणाले, अरे तू कुठे चाललास? तू गेलास तर माझं काम खोळंबेल. अन् तसंही तुम्हा सर्व पक्षांकडून समुद्र काही सुकला पण जाणार नाही. गरुड बोलला, देवा सल्ला नको साथ द्या. मग काय, हे ऐकून विष्णू देवही समुद्र सुकवण्यासाठी पुढे आले. विष्णू देवाला पाहून समुद्र घाबरला आणि त्याने त्या पक्षाची पिल्लं परत केली.
ही कथा अनेकांनी वाचली असेल. पण तशी स्थिती आज कळणे गावात निर्माण झाली आहे. आज कळणे गावात मायनिंगच्या संकट समई आपला सल्ला, आश्वासने नकोत, साथ हवी, अशी स्थिती आहे. कारण संकट खूपच गंभीर आहे. आज कळणेवासीय जात्यात आहेत. उद्या अन्य गावे असतील, हे येथे लक्षात घेतले पाहिजे.
कळणे येथे मायनिंगचा बांध फुटून जो हाहाकार उडाला, त्याला आठ दिवस पूर्ण झाले. या आठ दिवसांत राष्ट्रीय काँग्रेस वगळता जिल्हय़ाच्या राजकीय पटलावर प्रमुख भूमिका बजावणाऱया राजकीय पक्षांचे महत्त्वाचे पदाधिकारी येऊन गेले. कळणेवासीयांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी सर्वांनीच बोलून दाखवला. परंतु कळणेतील मायनिंग उत्खनन कायमस्वरुपी बंद व्हावे, यासाठी पुढील रणनीती काय असेल? याबाबत आश्वासने दिली गेली. आता प्रत्यक्षात कृतीची अपेक्षा कळणेवासीयांना आहे. कारण आश्वासनं या जिल्हय़ाला काही नवीन नाहीत. वस्तूतः वरील कथेप्रमाणे कळणेवासीयांना आता आश्वासने नकोत, प्रत्यक्ष कृती हवी आहे.
कळणेवासीय आज जात्यात आहेत, उद्या..!
कळणेवासीय आज प्रचंड त्रास भोगत आहेत. एखादे रोप, झाड मोठे होण्यासाठी मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ करावा लागतो आणि अशा बागायती कोणाच्यातरी चुकीमुळे नेस्तानाबूत झाल्या, तर त्याचे दुःख काय असते, हे ज्यांनी हे अनुभवलंय त्यांनाच विचारा. कळणे गावात कुठे, कोणती झाडे होती हेही दाखविणे अवघड झाले आहे. कष्टाने फुलविलेल्या बागायती मातीमोल झाल्या. आणि याच्या मुळाशी मायनिंग उत्खनन आहे. शेतकऱयांना ‘शासन निकषा’प्रमाणे भरपाई मिळेलही. प्रत्यक्षात त्याची किंमत शून्य आहे. या भरपाईत ही बागायती पुन्हा उभी राहणार आहे का, या प्रश्नाचं उत्तर शासनाकडे आहे का? विचार करा, पुन्हा शेती-बागायतीची सुरुवात केली, तर कळणेतील जनतेला एक पिढी मागे जावे लागणार आहे. वरील कथा काय सांगते? आज कळणेवासीयांना शेजारील गावांनी साथ दिली, तर अशक्य काहीच नाही. पुढील विध्वंस तरी वाचेल.
अशक्य काही नाही
कळणे गाववासीयांनी आता कायदेशीर मार्गाने लढा उभारावा, अशी एक बाब समोर येत असून त्यांना अनेक वन्यजीव संघटना मदत करण्यासाठी पुढे येणार आहेत. त्याचबरोबर कळणेवासीयांना शेजारील गावांनी साथ द्यायला हवी.
तब्बल 49 खाणी येऊ घातल्या आहेत
गोवा व महाराष्ट्रात पर्यावरणासंबंधी सक्रिय काम करतात ते डॉ. राजेंद्र केरकर यांनी तर दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात निसर्गाच्या निकोपाची मोठी भीती व्यक्त केली आहे. डॉ. केरकर यांच्या माहितीनुसार दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात तब्बल 49 ठिकाणी खाण प्रकल्प येऊ शकतात आणि त्यासाठी मायनिंग लॉबीचे प्रयत्न सुरू आहेत. जो कळणेत प्रकार घडला, तो इतर गावांत दूर नाही. त्यामुळे लोकांनी जागरुक राहायला हवे. कळणेवासीयांना साथ द्यायला हवी. डॉ. केरकर म्हणाले पर्यावरणाचा विध्वंस असाच सुरू राहिला आणि भविष्यात उत्खनन थांबले नाही, तर अनेक संकटे येणार आहेत. दोडामार्ग व गोव्याच्या बांदा व तिलारी या दोन नद्या जीवनदायिनी समजल्या जातात, त्या संपुष्टात येण्याची शक्यता आहे.