कर्ली नदीच्या पुराचा भविष्यात कायमच सामना
चौपदरीकरणात भराव घालून गावांचे केले दोन भाग
महामार्ग बंधारा सदृश पाणी राहते तुंबून
नजीकच्या गावांत घुसून मोठे नुकसान
अतिवृष्टीत आला प्रत्यय
पाणी निचऱयाचे योग्य नियोजन नाही
जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
प्रतिनिधी / कुडाळ:
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणावेळी कुडाळ शहर, पावशी, वेताळबांबर्डे, पिंगुळी या गावांसह अन्य गावांच्या मध्ये भराव घालून दोन भाग केल्याने या गावांना भविष्यात कायमच कर्ली नदीच्या पुराच्या पाण्याचा सामना करावा लागणार आहे.
अशातच पुराचे पाणी पूर्वी महामार्गावरुन वाहत होते. मात्र, आता बंधारा सदृश महामार्ग बांधला गेल्याने पाणी तुंबून राहते. साहजिकच कर्ली नदीचे पाणी किनाऱयालगतच्या गावांमध्ये घुसून मोठे नुकसान होते. याचा प्रत्यय नुकताच झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी आला. नानेली, मांडकुली, बिबवणे, माणगाव, आंबडपाल, मुळदे, साळगाव, घावनळे या गावांसह परिसरातील गावांना मोठा फटका बसला. घरांमध्ये पाणी शिरले. तसेच शेतीचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. मुंबई-गोवा महामार्गाचे बांधकाम करताना पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य नियोजन ठेकेदार कंपनीने केले नाही. तसेच जिल्हा प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेने व लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याने हे संकट ओढवले आहे. भविष्यात कायम हे संकट राहणार आहे.
पावशी-सातेरी मंदिर ते कुंभारवाडी व वेताळबांबर्डेपर्यंत पाणी महामार्गावर येऊन महामार्ग ठप्प झाला. यामुळे ठेकेदार कंपनीचे पितळ उघडे पडले आहे. अशातच लोकांनीही ओढे, पाण्याचे मार्ग यावर भराव घालून अतिक्रमण केल्याने त्याचाही फटका बसत आहे.
महामार्गाचे चुकीचे बांधकाम पुरास कारणीभूत
मुंबई-गोवा महामार्ग बांधताना विशेषत: वेताळबांबर्डे, पावशी, कुडाळ, पिंगुळी, बिबवणे या दरम्यान महामार्गाचे अंतिम नियोजन व बांधकाम चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने पुराचा फटका आता कायमच बसणार आहे. अशातच राजकीय कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीला नेत्यांनी समर्थन देऊन महामार्गाचा आराखडा बदलल्याने कुडाळ, पावशी, आंबडपाल, पिंगुळीला पुराच्या पाण्याचा कायमच विळखा पडणार आहे.
महामार्गाच्या आराखडय़ात केलेल्या बदलाचा फटका
महामार्गाच्या सुरुवातीच्या नियोजनाप्रमाणे कुडाळ शहरात भंगसाळ पूल व त्याला पुढेपर्यंत गाळे असलेला ओव्हरब्रिज होता. त्यानंतर मातीचा भराव व पुन्हा ओव्हरफ्लाय होता. अर्थात पाऊस व पूर पाहून महामार्गाचे नियोजन केले होते, असे म्हणायला हरकत नाही. मात्र, अंतिम बांधकाम करताना राजकीय नेत्यांच्या अट्टाहासापायी बदल करण्यात आला. ओव्हरफ्लाय झाला, तर कुडाळात लोक येणार नाहीत. बाजारपेठ संपेल, असे सांगून ओव्हरफ्लायला ठराविक लोकांनी विरोध केला. मात्र, ओव्हरफ्लाय हवा, असे सांगणारे पुढे आले नाहीत. राजकीय नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे ऐकून महामार्गाच्या आराखडय़ात बदल करून तसा महामार्ग करून घेतला. त्याचा फटका महामार्गावरील गावे व दुकानदार नागरिक यांना आता बसत आहे.
परिस्थिती भविष्यात गंभीर
यावेळी कुडाळ शहरात फारसा पाऊस झाला नाही. त्यामुळे मोठे नुकसान झाले नाही. मात्र, कर्ली नदीच्या पुराचे पाणी शहरातील सर्वच भागांपर्यंत पोहोचले. फक्त एकच फायदा की, महामार्गावरील वाहतूक तेवढी भंगसाळ व बेलनदी परिसरात सुरू राहिली. पण पावशी भागात सातेरी मंदिर ते कुंभारवाडी या दरम्यान पाणी महामार्गावर आल्याने वाहतूक बंद राहिली. महामार्ग बंधारा झाल्याने पाण्याचा निचरा न होऊन ही परिस्थिती निर्माण झाली आणि परिस्थिती भविष्यात गंभीर होणार आहे.
शहरातील काम निकृष्ट
कुडाळ शहरातील महामार्गाचे काम घाईगडबडीत केल्याने योग्य दर्जाचे झाले नाही. ठिकठिकाणी पाणी साचत असून खड्डेही पडले आहेत. महामार्गाला पातळी नसल्याने वाहने चालविणेही त्रासदायक ठरत आहे. येथील हॉटेल राजकडील संरक्षक भिंत तसेच महामार्गावरही खड्डा पडला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्याचे ऑडिट होण्याची गरज आहे. सर्व्हिस रोड, जोडरस्त्यांवर नुसते डांबर पसरले असून त्यांचे मजबूतीकरण करण्यात आले नसल्याचे पहिल्याच पावसात दिसून येत आहे.
महामार्ग मूळ नकाशाप्रमाणे नाहीच
कुडाळ शहरातून जाणारा महामार्ग पूर्वी ज्या ठिकाणी दाखविण्यात आला होता. तेथे बांधण्यात आलेला नसून काही मोठय़ा धनदांडग्या तसेच राजकीय लोकांच्या मागणीप्रमाणे तो मागे-पुढे करण्यात आला. प्रत्यक्ष महामार्गाची आखणी व आता झालेला महामार्ग हे एकाच ठिकाणी नाही आहेत. काही बडय़ा लोकांना संरक्षण देण्यासाठी महामार्ग त्या-त्याठिकाणी अरुंद करण्यात आला आहे.
पुराचे संकट आता दरवर्षी
सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपला स्वार्थ साधून घेतला, तर काही धनदांडग्यांनी ठेकेदाराच्या माणसांना हाताशी धरुन आपला स्वार्थ साधला आणि जादा मोबदलाही मिळविला. यात सर्वसामान्य कुडाळवासियांना मात्र न्याय मिळाला नाही. कुडाळसह पावशी, पिंगुळी, आंबडपाल, बिबवणे या गावांना आता दरवर्षी पुराच्या संकटाला तोंड द्यावे लागेल, हे निश्चित आहे.