कर्नाटकात काँग्रेसचा क्लिन स्वीप
पोटनिवडणुकीत तिन्ही मतदारसंघात विजय : शिग्गावमध्ये बोम्माईपुत्र तर चन्नपट्टणमध्ये कुमारस्वामींच्या मुलाचा पराभव
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटकातील तीन विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने झालेली पोटनिवडणूक सत्ताधारी काँग्रेसने जिंकून भाजप-निजद नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला मोठा धक्का दिला आहे. शिग्गाव, चन्नपट्टण आणि संडूर या तिन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेस उमेदवारांनी बाजी मारली आहे. शिग्गाव आणि चन्नपट्टणमध्ये युतीच्या घराणेशाहीला मतदारांनी नाकारले आहे. त्यामुळे बोम्माई आणि देवेगौडा घराण्यातील तिसऱ्या पिढीचे राजकीय मनसुबे धुळीला मिळाले आहेत. शिग्गावमधून माजी आमदार यासीर अहमद खान पठाण, चन्नपट्टणमधून माजी मंत्री सी. पी. योगेश्वर आणि संडूरमधून ई. अन्नपूर्णा यांनी विजयपताका फडकविली आहे.
देशाचे लक्ष लागलेल्या तीन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवारांनी क्लिन स्वीप करत एनडीएला दणका दिला. संडूर मतदारसंघ राखण्याव्यतिरिक्त, निजद आणि भाजपच्या ताब्यात असलेले दोन मतदारसंघ जिंकून काँग्रेसने विधानसभेतील आपली स्थिती आणखी मजबूत केली आहे. मुडा प्रकरण, वाल्मिकी निगममधील गैरव्यवहार, वक्फ घोटाळा, रेशनकार्ड रद्द प्रकरण आणि पोटनिवडणुकीत मंत्री जमीर अहमद यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मतदारांवर काहीही परिणाम झाला नसल्याचे पोटनिवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. पोटनिवडणुकीत भाजप-निजद युतीच्या नेत्यांची रणनीती फळाला आली नाही.
या निकालाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची खुर्ची अधिक भक्कम झाली असून, त्यांना सत्तेवरून हटवणे सोपे जाणार नाही, असा संदेश त्यांनी विरोधकांना आणि स्वपक्षातील नेत्यांनाही दिला आहे.
बसवराज बोम्माई यांना धक्का : मुलाचा पराभव जिव्हारी
सहजपणे विजय मिळण्याची अपेक्षा बाळगलेल्या शिग्गाव मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. येथे काँग्रेसचे उमेदवार यासीर अहमद खान पठाण यांनी विजय मिळविला आहे. मागील सलग चार निवडणुकांमध्ये भाजपने वर्चस्व निर्माण केलेल्या शिग्गाव मतदारसंघावर काँग्रेसने ताबा मिळविला आहे. मतदारसंघावर स्वत:ची मजबूत पकड असलेले खासदार व माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे पुत्र भरत बोम्माई भाजपच्या तिकिटावर पोटनिवडणूक रिंगणात होते. त्यांना काँग्रेसच्या यासीर अहमद खान यांनी 13,448 मतफरकाने पराभवाची धूळ चारली. भरत बोम्माई यांना 87,308 मते मिळाली तर यासीर यांना 1,00,756 मते मिळाली. पहिल्या पाच फेरीतील मतमोजणीत भरत बोम्माई आघाडीवर होते. मात्र, मुस्लीमबहुल मतदार असलेल्या भागातील मतमोजणी सुरू झाल्यानंतर साहजिकच यासीर यांनी शेवटच्या म्हणजेच 18 व्या फेरीतील मतमोजणीपर्यंत आघाडी राखली. या निकालामुळे आपल्या मुलाला पोटनिवडणूक रिंगणात उतरविलेल्या बसवराज बोम्माई यांना धक्काच बसला आहे.
देवेगौडा यांच्या नातवाची पराभवाची हॅट्ट्रीक
केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातच जणू काही लढत असल्याची स्थिती निर्माण झालेल्या चन्नपट्टणममध्ये काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री सी. पी. योगेश्वर सहज विजयी झाले. मागील विधानसभा निवडणुकीत रामनगर, मागडी आणि कनकपूर येथे विजय मिळवलेल्या काँग्रेसने पोटनिवडणुकीत चन्नपट्टण जिंकून संपूर्ण रामनगर जिल्हा निजदमुक्त केला. केंद्रीय मंत्री एच. डी कुमारस्वामी यांचे पुत्र निजदच्या तिकिटावर रिंगणात होते. त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवार योगेश्वर यांनी पराभूत केले. योगेश्वर यांना 1,12,642 तर निखिल यांना 87,229 मते मिळाली. निजदने अनेक दशकांनंतर रामनगर जिल्ह्यातील आपले अस्तित्व गमावले आहे. निखिल यांचा हा सलग तिसरा पराभव आहे. चन्नपट्टणमध्ये पराभूत झालेले निखिल 2028 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा चन्नपट्टणमधून निवडणूक लढवणार की रामनगरला जाणार याची उत्सुकता आहे.
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विरोधी पक्षनेते आर. अशोक, माजी मंत्री अश्वत्थ नारायण यांच्यासह अनेक नेत्यांनी केलेला प्रचार निखिल यांना विजयापर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरला. तर पोटनिवडणूक गांभीर्याने घेतलेले उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सहा महिन्यांपूर्वी मतदारसंघात तळ ठोकून मतदारांची मने जिंकली होती. त्याची रणनीती सफल ठरली.
बळ्ळारी जिल्ह्यातील संडूर मतदारसंघ जिंकून नवा इतिहास रचण्याचे स्वप्न बाळगलेल्या माजी मंत्री गाली जनार्दन रे•ाr यांनाही मतदारांनी ‘धडा’ शिकविला आहे. ई. तुकाराम यांनी लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या संडूरमध्ये तुकाराम यांची पत्नी ई. अन्नपूर्णा यांना काँग्रेसने तिकीट दिले. त्यांचाही विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे बंगारु हनुमंत यांना पराभवाचा धक्का देत मतदारसंघावरील काँग्रेसची पकड आणखी मजबूत केली. त्यांनी 9,649 मताधिक्य राखले. अन्नपूर्णा यांना 93,616 तर बंगारु हनुमंत यांना 83,967 मते मिळाली.
एक्झिट पोलचे अंदाज ठरले खोटे...
कर्नाटकातील पोटनिवडणुकीसंबंधी मतदानोत्तर सर्वेक्षणात भाजप-निजद युतीला दोन तर काँग्रेसला एका जागेचे अनुमान होते. परंतु, एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरले आहे. पी-मार्क्स या संस्थेच्या सर्वेक्षणात चन्नपट्टणमध्ये निजद, शिग्गावमध्ये भाजप आणि संडूरमध्ये काँग्रेसला विजय मिळेल, असे सांगण्यात आले होते. तर चाणक्य टाईम्स 24×7 या संस्थेच्या सर्वेक्षणातही हेच अनुमान वर्तविण्यात आले होते. परंतु, तिन्ही जागांवर सत्ताधारी काँग्रेसने वरचष्मा राखला आहे.
गॅरंटी योजनांचा विजय!
विरोधी पक्षांकडून अपप्रचार, गॅरंटी योजनांविषयी खोटा प्रचार केला. मात्र, कर्नाटकातील जनतेने काँग्रेस सरकारवर विश्वास दाखविला आहे. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वाखाली जारी झालेल्या गॅरंटी योजना आणि विकासकामांचा विजय झाला आहे. राज्यात भावनेचे राजकारण चालत नाही. आता तरी विरोधी पक्षांनी टीका, खोटा प्रचार करणे थांबवावे.
- डी. के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
आमच्या संकल्पाला आणखी बळकटी!
राज्यातील पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवारांनी मिळविलेला विजय हा राज्य सरकारच्या कामगिरीचे, पक्षाच्या तत्त्वसिद्धांताचे आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रामचा विजय आहे. या विजयाने आमच्या सरकारवरील जबाबदारी आणखी वाढली आहे. जनतेसाठी राबण्यासाठी आम्ही केलेल्या संकल्पाला पोटनिवडणूक निकालामुळे आणखी बळकटी प्राप्त झाली आहे.
- सिद्धरामय्या, मुख्यमंत्री
पराभवाची कारणे शोधणार!
राज्यातील तिन्ही मतदारसंघांमध्ये आमची पिछेहाट झाली आहे. चन्नपट्टणमध्ये मित्रपक्ष निजद आणि शिग्गावमध्ये भाजपचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास होता. मात्र, निराशा झाली आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठक घेऊन पराभवाची कारणे शोधण्यात येतील. आगामी दिवसात पुन्हा मुसंडी मारण्यासाठी परिश्रम घेण्यात येईल.
- बी. वाय. विजयेंद्र, भाजप प्रदेशाध्यक्ष
मतदारसंघ विजयी उमेदवार व मते पराभूत उमेदवार व मते मताधिक्य
शिग्गाव यासीर अहमद खान पठाण भरत बोम्माई 13,448
1,00,756 87,308
चन्नपट्टण सी. पी. योगेश्वर निखिल कुमारस्वामी 25,413
1,12,642 87,229
संडूर ई. अन्नपूर्णा बंगारु हनुमंत 9,649
93,616 83,967
► विधानसभेतील बलाबल
काँग्रेस 138
भाजप 65
निजद 17
इतर 4
एकूण 224