महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कर्जमुक्तीसाठी रचला डाव, घेतला प्राण

05:55 AM Aug 25, 2021 IST | Abhijeet Khandekar
शैलश तांबे
Advertisement

असलदेतील युवकाच्या कबुलीजबाबातून धक्कादायक माहिती : खून झालेल्या व्यक्तीबाबत गूढच

Advertisement

वार्ताहर / कणकवली:

Advertisement

अंत्यसंस्कार झाले. दिवसकार्यही झाले. आणि त्यानंतर तब्बल 22 दिवसांनी सोमवारी वैभववाडी पोलीस ठाण्यात प्रकटलेल्या शैलेश संजय तांबे (28, असलदे - बौद्धवाडी) याची कणकवली पोलिसांनी कसून चौकशी केली. चौकशीत असलदे येथील माळरानावर जळून मयत स्थितीत आढळलेला मृतदेह एका परप्रांतीयाचा असून त्याला आपणच भरपूर दारू पाजून, बेशुद्ध करून पेट्रोलद्वारे पेटवून दिले होते, अशी धक्कादायक कबुली शैलेश याने दिली आहे. कर्जाचा मोठा बोजा असल्याने त्यातून सुटका मिळविण्यासाठी कामगारास मारून त्याद्वारे स्वत:च्याच आत्महत्येचा बनाव रचल्याचे शैलेशने पोलिसांना सांगितले.

सोमवारी स्वत:च्याच हाताने स्वत:ला जखमा करून वैभववाडी पोलिसांत हजर झाल्याचेही त्याने सांगितले. शैलेशच्या कबुलीनुसार पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे यांनी फिर्याद दिली असून शैलश याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्याचा ताबा घेण्यात आलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.

...तेथूनच घटनेची उकल

2 ऑगस्टला रात्री 3 वाजण्याच्या सुमारास असलदे येथील माळरानावर असलेल्या शरयू रमाकांत तांबे यांच्या काजू, आंबा बागेतील मांगरामध्ये पुरुषाचा मृतदेह आढळला. घटनास्थळी काळय़ा रंगाची सॅक व त्यामध्ये शैलेश याचा कोकण रेल्वेमधील गणवेश होता. सोबतच काळय़ा रंगाचे पाकीट व त्यात मतदान ओळखपत्र, डेबिटकार्ड अशी कागदपत्रेही होती. मृतदेहाची शरीरयष्टीही शैलेश याच्यासारखीच असल्याने मृतदेह शैलेश याचाच असल्याची नातेवाईकांचीही खात्री पटली होती. तशी नोंदही पोलिसांत झाली. पण, 19 ऑगस्टला शैलेशच्या पत्नी मयुरी यांनी, आपणाला काही दिवसांपासून अनोळखी क्रमांकावरून धमकीचे कॉल येत असल्याचे पोलिसांना सांगितले. पलिकडून बोलणारा शैलेशच असल्याचे मयुरी सांगत असल्याने पोलिसांच्याही मनात शंकेची पाल चुकचुकली होती.

चौकशीत खळबळजनक माहिती

दरम्यान, सोमवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास शैलेश हा अचानक वैभववाडी पोलीस ठाण्यात जखमी स्थितीत दाखल झाला. कोकिसरे येथे काहींनी आपणाला मारहाण केल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी त्याने आपले खरे नाव - गाव सांगितल्याने वैभववाडी पोलिसांनी कणकवली पोलिसांशी संपर्क साधला. तोपर्यंत शैलेशच्या नातेवाईकांनीही पोलिसांकडे ‘हा शैलेशच आहे’ अशी कबुली दिली. जखमी शैलेश याला सुरुवातीला वैभववाडी शासकीय रुग्णालय व तेथून कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी पोलिसी चौकशीत खळबळजनक माहिती समोर आली.

कर्जबाजारीपणाला कंटाळला होता

शैलेश हा 2014 पासून कोकण रेल्वेमध्ये कामाला असून 2018 मध्ये त्याचे लग्न झाले. सध्या त्याचे कोकण रेल्वेतील कामानिमित्त मडगाव येथे वास्तव्य होते. 2017 मध्ये त्याने काही बँकांची तसेच इतर फंडांमधून कर्जे काढली. दुचाकीसाठीही त्याने कर्ज घेतले. त्यातच पत्नीचेही काही कर्ज होते. अर्थात ही कर्जे फेडणे शक्य नसल्याने तो वैतागला होता. कर्जातून सुटका मिळविण्यासाठी तो उपाय शोधत होता.

अन् आत्महत्येचा बनाव

एके दिवशी मडगाव मार्केट येथे काही मजूर थांबलेले त्याने पाहिले.  आपल्यासारख्याच दिसणाऱया एखाद्या मजुरास ठार मारावे व आपणच मेलो, असे भासवावे. जेणेकरून आपले कर्ज माफ होईल व पुढील आयुष्य चांगले जाईल, असा विचार त्याच्या मनी आला. हाच विचार सत्यात उतरविण्यासाठी त्याने पावले उचलली. 21 ऑगस्टला त्याने पुन्हा मडगाव मार्केट गाठले. तेथे साधारण त्याच्याच शरीरयष्टीचा, अंदाजे 28 वर्षीय परप्रांतीय मजूर त्याच्या दृष्टीस पडला. इतर मजूर त्याला ‘भैय्या’ नावाने हाक मारत होते. त्याला पाहताच आपल्या मनातील विचार साध्य करण्यासाठी हाच युवक योग्य असल्याचे शैलेश याला जाणवले.

युवकास मडगावहून माळरानावर आणले

त्याने त्या युवकास ‘शेतीचे काम करण्यासाठी माझ्यासोबत येतोस का?’ अशी विचारणा केली. युवकानेही होकार दिल्याने शैलेश त्या युवकासह दुचाकीने असलदे येथे जाण्यास निघाला. वाटेत त्यांनी भरपूर दारुही प्राशन केली. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ते असलदे येथे पोहोचले. शैलेश हा त्या युवकास आपल्या घरापासून जवळपास दीड किमी अंतरावर असलेल्या, फक्त पायवाट असलेल्या जंगलमय माळावर घेऊन गेला.

दारू पाजली आणि पेटवून दिले

माळरानावर शैलेशच्या आत्येची आंबा, काजूची बाग असून आतमध्ये छोटेखानी, पण बंदिस्त मांगर आहे. दोघेही त्या मांगरामध्ये गेले. तेथेही शैलेश याने त्या युवकास भरपूर दारू पाजली. त्यानंतर तो युवक बेशुद्ध पडला. शैलेश तेथून बाहेर पडला. असलदे येथीलच एकाकडून कॅन घेऊन त्याने पेट्रोलपंप गाठला. तेथून तीन लीटर पेट्रोल घेऊन तो पुन्हा मांगरात दाखल झाला. यावेळी कोणताही विचार न करता त्याने बेशुद्ध पडलेल्या युवकाच्या अंगावर पेट्रोल ओतून माचीसने चक्क पेटवून दिले.

युवक मेल्यानंतर शैलेश पसार

युवक जळून मयत झाला, याची खात्री झाल्यानंतर शैलेशने सोबत आणलेली आपली बॅग तिथेच ठेवली. आपली तुटली चप्पलही तिथेच ठेवून मयत युवकाची चप्पल घातली, जेणेकरून आपणच मेलो असल्याची सर्वांना खात्री पटावी. त्यानंतर तेथून पसार होत तो महामार्गावर आला व ट्रकद्वारे पनवेल गाठले. पनवेल येथे दोन दिवस लॉजवर राहिल्यानंतर तो पुणे येथे गेला. तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो रत्नागिरी येथे गेला. दरम्यानच्या कालावधीत त्याच्याकडील पैसेही संपले. त्यामुळे त्याने आपल्याकडील मोबाईल एकाला विकला व त्याद्वारे मिळालेल्या पैशांतून एक साधा मोबाईल तसेच सीमकार्डही विकत घेतले. याच मोबाईलवरून तो पत्नीस कॉल करीत होता.

रक्तबंबाळ स्थितीत पोलिसांत

नेमके काय करायचे ते समजत नसल्याने शैलेश 23 ऑगस्टला दुपारी 3.30 वा. सुमारास तो ट्रकने वैभववाडीत गेला. तेथे आपल्याकडील मोबाईल ओहोळात फेकला. तेथीलच मोठा दगड स्व:वरच मारून घेतला. एका ठिकाणी असलेल्या कुंपणाच्या तारांद्वारे स्वत:ला रक्तबंबाळ करून घेतले व तो पोलिसांत हजर झाला.

घटनास्थळ निर्जन

सदरची घटना जेथे घडली, तो मांगर शैलेश याच्या राहत्या घरापासून जवळपास दीड किमी अंतरावर, निर्जनस्थळी आहे. असलदे बौद्धवाडी येथून एक जंगलमय पायवाट आहे. या पायवाटेत एक छोटेखानी साकव असून तेथून पुढे गेल्यावर ओहोळही लागतो. ओहोळाच्या पाण्यातून चालत पुढे गेल्यानंतर मुख्य माळ लागत असून याच माळावर शैलेशच्या आत्याची बाग व मांगर आहे. गावातील लोकांचाही या माळाशी सहसा संबंध येत नाही. परिणामी परप्रांतीय युवकाला जाळून मारल्याची कुणकुण ग्रामस्थांना तात्काळ लागू शकली नव्हती.

शैलेश क्वचितच गावी यायचा

शैलेश याचे असलदे - बौद्धवाडी येथे मूळ घर असले, तरी त्याचे आई, पत्नी, छोटा मुलगा असे कुटुंबिय वैभववाडी येथे वास्तव्यास असतो. शैलेश कामानिमित्त मडगाव येथे असला, तरी तो कधीतरी वैभववाडीला येत असे. पण, असलदे येथे त्याचे फारसे येणे होत नसे. कधी आला तरी तो फारसे कुणाशी बोलत नव्हता, असे ग्रामस्थ सांगतात. त्याची आई आठवडय़ातून एखादा दिवस असलदे येथील घरी येऊन जाते, असे ग्रामस्थ सांगतात.

मृत भैयाची ओळख पटविण्याचे आव्हान

शैलेश याने परप्रांतीय भैयाला जाळून मारल्याची कबुली दिली असली, तरी त्या भैय्याचे नाव-गाव, तो मूळ कुठला, याची कोणतीही माहिती त्याच्याकडे नाही. मडगाव मार्केटमध्ये त्याला तेथील काहीजण भैया म्हणून हाक मारायचे, एवढीच माहिती आपल्याकडे असल्याचे शैलेश पोलिसांना सांगत आहे. त्यामुळे त्या भैय्याची ओळख कशी पटवावी, हा प्रश्न कणकवली पोलिसांसमोर आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatsindhudurg#tarunbharatSocialMedia
Next Article