करसेवकांच्या सुटकेसाठी 48 तासांचा अल्टिमेटम
भाजपचा राज्य सरकारला इशारा : राज्यव्यापी आंदोलन
प्रतिनिधी/ बेंगळूर
जुन्या प्रकरणात अटक केलेल्या करसेवकांची सुटका करण्यासाठी भाजपने राज्य सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. हुबळीत पोलिसांनी अटक केलेल्या करसेवकांची सुटका न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने हुबळी पोलीस स्थानकाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
31 वर्षांपूर्वी रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या हुबळीतील हिंदू कार्यकर्त्यांना काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. याविरोधात भाजपने बुधवारी राज्यव्यापी आंदोलन छेडले. बेंगळूरमधील फ्रीडम पार्कवर प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप नेत्यांनी आंदोलन केले. याप्रसंगी विजयेंद्र म्हणाले, 31 वर्षांपूर्वी रामजन्मभूमी आंदोलनात करसेवक सहभागी झाले होते. या जुन्या प्रकरणात आता करसेवकांना अटक करणे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांना 48 तासांची मुदत देत आहे. अटक करण्यात आलेले करसेवक श्रीकांत पुजारी यांची सुटका करावी. अन्यथा भाजप युवा मोर्चाच्यावतीने हुबळी पोलीस स्थानकाला घेराव घालण्यात येईल. आवश्यकता भासली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करून, असा इशारा विजयेंद्र यांनी दिला.
करसेवकांच्या अटकेच्या मुद्द्यावरून राज्यपालांची भेट घेऊन न्याय मागण्यात येईल. राज्यात मोगलशाही, तालिबानी प्रशासन असावे, अशी शंका निर्माण झाली आहे. हिंदुंच्या हक्कांचे दमण करण्याचे काम रामविरोधी सिद्धरामय्या सरकारकडून होत आहे. काँग्रेसच्या हिंदूविरोधी धोरणाला जनता चांगलाच धडा शिकवेल, असेही ते म्हणाले.
आंदोलनात माजी मुख्यमंत्री सदानंदगौडा, माजी मंत्री डॉ. अश्वत्थ नारायण, खासदार पी. सी. मोहन, आमदार रवी सुब्रह्मण्य, विधानपरिषद सदस्य चलवादी नारायणस्वामी, भाजपचे मुख्य सचिव प्रीतम गौडा, उपाध्यक्षा माळविका अविनाश आदी पदाधिकारी उपस्थित होते.