कच्च्या तेलाचे दर 115 डॉलर्सवर
पेट्रोल-डिझेलचे दर भडकण्याचे संकेत : विधानसभा निवडणुकांनंतर दिसणार परिणाम
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रशिया-युपेन युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाची (ब्रेंट क्रूड) किंमत गुरुवारी प्रतिबॅरल 115 डॉलर्सच्या वर गेली. वाढीव दरांमुळे येत्या काही दिवसांत भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भडकण्याची चिन्हे व्यक्त होत आहेत. गेल्या 120 दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, कच्च्या तेलाच्या दरात जवळपास 70 टक्क्मयांनी वाढ झाल्यामुळे भारतात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपताच इंधन दरवाढीचा भडका उडू शकतो. दरम्यान, कच्च्या तेलाचा भाव 150 डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोदी सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यास दिरंगाई करत आहे. मात्र, निवडणुका संपल्या की भाव वाढवण्यास विलंब केला जाणार नाही. सध्या देशात उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याचा निकाल 10 मार्चला लागणार आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ापासून दरात वाढ होण्याचा अंदाज आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एकाचवेळी वेळी मोठी दरवाढ न करता प्रत्येक दिवशी थोडी-थोडी वाढ केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
प्रतिलिटर 20-25 रुपये वाढ दृष्टिपथात
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल 115 डॉलर्सच्या वर गेली आहे. त्याचवेळी, तेल कंपन्यांनी 3 नोव्हेंबरपासून पेट्रोलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही, परंतु तेव्हापासून कच्चे तेल प्रतिबॅरल 40 डॉलर्सपेक्षा महाग झाले आहे, असे आयआयएफएल सिक्मयुरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी स्पष्ट केले. साहजिकच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 20 ते 25 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. कच्चे तेल प्रतिबॅरल 1 डॉलरने वाढल्यास देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रतिलिटर 55-60 पैशांनी वाढतात, असे रेटिंग एजन्सी इक्राचे उपाध्यक्ष आणि सह-समूह प्रमुख प्रशांत वशि÷ यांनी स्पष्ट केले.
तेल कंपन्यांना प्रतिलिटर पाच ते सहा रुपयांचा तोटा
डिसेंबर 2021 मध्ये क्रूडची सरासरी किंमत 73 डॉलर्सच्या आसपास असताना तेल कंपन्यांना प्रतिलिटर 8-10 रुपये अतिरिक्त नफा मिळत होता. मात्र, आता कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर 5 ते 6 रुपये तोटा सहन करावा लागत आहे. क्रूडच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने कंपन्यांच्या तोटय़ातही सातत्याने वाढ होत आहे.
रशिया-युपेन युद्धामुळे क्रूडच्या किमतीत मोठी वाढ
24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युपेनवर आक्रमण केल्यानंतर लगेचच जगभरातील शेअरबाजार कोसळले, सोन्याच्या किमती वाढल्या आणि कच्च्या तेलाने विक्रमी पातळी गाठली. रशिया तेल आणि नैसर्गिक वायूचा प्रमुख उत्पादक आहे. 2020 मध्ये कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू कंडेन्सेटच्या उत्पादनात रशिया दुसऱया क्रमांकावर होता. या काळात रशियाने 10.1 दशलक्ष बॅरल प्रतिदिन उत्पादन केले. रशिया आपल्या गरजा भागवण्यासाठी यातील निम्मे तेल वापरतो आणि दररोज 5 दशलक्ष ते 6 दशलक्ष बॅरल निर्यात करतो. युपेनच्या आक्रमणामुळे रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे क्रूडच्या पुरवठय़ावर परिणाम होऊ शकतो. या भीतीमुळे कच्च्या तेलाचे दर भडकत चालले आहेत.