ओटीटीवर पोर्नोग्राफी दाखविण्यात येतेय !
सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त ; ओटीटीवरील कंटेंटचे स्क्रीनिंग व्हावे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ओव्हर द टॉप म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दाखविण्यात येणाऱया कंटेंटचे स्क्रीनिंग व्हावे, कारण काही प्लॅटफॉर्म्सवर पोर्नोग्राफीही दाखविण्यात येत असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी चिंता व्यक्त केली आहे. समाजमाध्यम आणि ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सचे नियमन करण्यासाठी तयार केलेली मार्गदर्शक तत्वे सोपविण्याचा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे.
अमेझॉनच्या क्रिएटिव्ह प्रमुख अपर्णा पुरोहित यांच्या अंतरिम जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली आहे. तांडव या वेबसीरिजमध्ये हिंदू देवतांचा अपमान होणे आणि पंतप्रधानांसारख्या घटनात्मक पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्याच्या आरोपानंतर उत्तप्रदेशच्या तीन शहरांमध्ये एफआयआर नोंदविण्यात आला होता.
लखनौमध्ये नोंद एफआयआरमध्ये अमेझॉनच्या क्रिएटिव्ह प्रमुखांचेही नाव आहे. याच्या विरोधात त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता, जो उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर पुरोहित यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाकडून गुरुवारीही त्यांना जामीन मिळालेला नाही. याप्रकरणाची सुनावणी शुक्रवारपर्यंत टाळण्यात आली आहे.
चित्रपट पाहण्याची जुनी पद्धत
चित्रपट पाहण्याची पारंपरिक पद्धत आता जुनी झाली आहे. लोकांचे इंटरनेटवर चित्रपट पाहणे आता सामान्य बाब आहे. अशा स्थितीत त्यांचे स्क्रीनिंग का होऊ नये असा आमचा प्रश्न असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले आहे. अपर्णा पुरोहित अमेझॉनच्या कर्मचारी आहेत. याप्रकरणी निर्माते आणि अभिनेते आरोपी आहेत. कंपनी आरोपी नाही, केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी अशाप्रकारचे गुन्हे नोंदविले जात असल्याचा युक्तिवाद पुरोहित यांच्या वकिलाने केला आहे.
जानेवारीत प्रदर्शित तांडव सैफ अली खान, मोहम्मद जीशान अयूब आणि डिंपल कपाडिया हे कलाकार असलेली तांडव वेबसीरिज जानेवारीमध्ये अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली होती. सीरिजमधील अनेक दृश्यांवर आक्षेप घेण्यात आले होते. यात हिंदू देवतांचा अपमान, पोलिसांची प्रतिमा चुकीचे दर्शविणे आणि पंतप्रधानासारख्या घटनात्मक पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविल्याचा आरोप होता.