ओटवणेत नाल्याचे पाणी हिरवे
- पंधरवडय़ात दोनवेळा घडला प्रकार
- शास्त्रज्ञ म्हणतात, ही नैसर्गिक प्रक्रिया
दीपक गावकर / ओटवणे:
सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे ब्राह्मण स्थळानजीकच्या नाल्यातील वाहत्या पाण्याने अचानकपणे गडद हिरवा रंग धारण करीत ओटवणेवासीयांना अक्षरश: चक्रावून टाकले. नेहमी निळेभोर दिसणारे पाणी गडद हिरवेगार होऊन वाहू लागल्याने ओटवणेवासीय आश्चर्यचकित झाले. अवघा तीन, चार तासांचा हा चमत्कार होता. त्यानंतर पाण्याने मूळ रंग धारण केला. पंधरा दिवसांपूर्वी याच नाल्यात ग्रामस्थांनी असाच प्रकार अनुभवला होता.
खरं तर पाण्याला रंग नसतो. पाणी पारदर्शक असते. मात्र तरी देखील शुद्ध पाण्याला खूप लांबून पाहिल्यानंतर त्यात निळय़ा, हिरव्या, पिवळय़ा छटा दिसतात. पाण्याचा प्रवाह थांबला की, पाणी हिरवा अथवा काळा रंग धारण करते. कधी-कधी पाण्यावर सप्तरंगी तवंग देखील येतात. बर्फामधून उगम पावणाऱया नद्यांच्या पाण्याचा रंग निळा असतो. मान्सूनच्या सिझनमध्ये डोंगर, दऱयातून वाहून येणाऱया पाण्याला मातीचा लाल अथवा पिवळट रंग प्राप्त होतो. समुद्राच्या पाण्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात हिरवट आणि निळे असे दोन प्रकार असतात. या पाण्यांमध्ये असणारे जीवाणू आणि मिनरल्स यामुळे पाण्याचे रंग दिसतात, असे म्हटले जाते.
ग्रामस्थ चकित
गोडय़ा पाण्याच्या नदी, तलाव वा डोहांमध्ये पाणी नेहमी नितळ असलेले आपणास दिसते. परंतु, पाण्याचे वाहणे बंद झाले की, एक तर पाण्यामध्ये शेवाळ तयार होऊन ते हिरवे बनते अथवा काळपट बनते. परंतु नदी, नाल्यांमधील वाहते पाणी कधी गडद हिरव्या रंगाचे दिसत नाही. परंतु, ओटवणे गावातील ब्राह्मणस्थळ परिसरात शांतपणे वाहणाऱया एका स्वच्छ व नितळ पाण्याच्या नाल्यामध्ये अचानकपणे पाण्याने गडद हिरवा रंग धारण केल्याने ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्काच बसला. तब्बल दोन ते तीन तास पाण्याचा हा रंग टिकून होता. त्यानंतर अचानकपणे हे पाणी पुढे-पुढे वाहत जाऊन त्यानंतर हा रंग पूर्ववत झाला.
ही नैसर्गिक प्रक्रिया
दरम्यान या नैसर्गिक चमत्काराबाबत कोकण कृषी विद्यापीठाच्या मुळदे येथील कृषी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नितीन सावंत यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, हा चमत्कार वैगरे काही नसून हा पाण्याने भरलेल्या नाल्यालगतच्या भातखाचरातील शेवाळ पावसाच्या पाण्याबरोबर नदीमध्ये पोहोचल्याने पाण्याचा हा रंग गडद हिरवा झाला असल्याची दाट शक्यता आहे. याबाबत अधिक खुलासा करताना ते म्हणाले, ज्यावेळी भात खाचरांमध्ये पाणी साचून असते, त्यावेळी सूर्याची किरणे थेट भाताच्या मुळापर्यंत पोहोचली तसेच मातीचा अंश त्याचा सपोर्टिंगला भेटला, तर हे शेवाळ अधिक पोसले जाते. ज्यावेळी मोठा पाऊस येतो, त्यावेळी भातखाचरातील पोसलेले हे शेवाळ लगतच्या नाल्यामध्ये वाहून जमा होते आणि त्यामुळे पाणी हिरवेगार दिसू शकते. ज्यावेळी हे शेवाळ पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाते, त्यानंतर उरलेले पाणी पूर्ववत नितळ बनते. ओटवण्यातील प्रकार हा अशातलाच असावा असा अंदाज त्यानी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला.