For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियात कडक शिस्तीची छडी..कोरोनाला पडतेय भारी!

05:45 AM Apr 13, 2020 IST | Abhijeet Khandekar
ऑस्ट्रेलियात कडक शिस्तीची छडी  कोरोनाला पडतेय भारी
ऑस्ट्रेलिया : श्रेया सामंत ऊर्फ प्रज्ञा प्रभू आपला मुलगा विराज याच्यासह.
Advertisement

पूर्ण नियंत्रण ठेवण्यात मिळविले यश

Advertisement

मूळ वेताळबांबर्डेतील श्रेया सामंत यांनी केले अनुभव शेअर

दक्षिण ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरात वास्तव्य

Advertisement

एकावेळी दोनच व्यक्ती एकत्र बाहेर जाऊ शकतात

कोणत्याही प्रकारचे लॉकडाऊन नाही

हॉटेलसह सर्व जीवनावश्यक सेवा सुरू

मात्र कडक शिस्तीचे निर्बंध

प्रमोद ठाकुर / कुडाळ:

ऑस्ट्रेलिया
देशातील कडक शिस्त आणि चुकीचे वागल्यास मोठय़ा रकमेचा होणारा दंड यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव
रोखण्यात तेथील प्रशासनाने यश मिळविले आहे. जगभरात कोरोनाचे संकट वाढत असताना ऑस्ट्रेलियाच्या
कडक शिस्तीने तेथे मात्र पूर्ण नियंत्रण ठेवण्यात यश मिळविले आहे.

एकावेळी
दोनच व्यक्ती एकत्र बाहेर जाऊ शकतात. हा नियम 24 तास लागू असतो. कोणत्याही प्रकारचे
लॉकडाऊन येथे नाही. हॉटेलसह सर्व जीवनावश्यक सेवा सुरू आहेत. मात्र, त्यावर कडक शिस्तीचे
निर्बंध आहेत, असे मूळ कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे-पावणाईटेंब येथील रहिवासी व
सध्या दक्षिण ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरात वास्तव्यास असलेल्या सौ. श्रेया श्रीकृष्ण
सामंत यांनी सांगितले.

दक्षिण
ऑस्ट्रेलियातील पर्थ या शहरात पती श्रीकृष्ण व मुलगा विराज यांच्यासह त्या राहतात.
सामंत हे पर्थ एअरपोर्ट येथे एव्हिएशन प्रोटेक्शन ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत, तर श्रेया
(पूर्वाश्रमीच्या प्रज्ञा प्रभाकर प्रभू, मातोंड-तळवडे, ता. वेंगुर्ले) लहान मुलांच्या
संगोपन प्रकल्पात काम करतात. सात वर्षांपूर्वी सामंत कुटुंबीय ऑस्ट्रेलियात गेले. तत्पूर्वी
ते मुंबई येथे नोकरीनिमित्त राहत होते.

ऑस्ट्रेलियात कोरोना नियंत्रणातच

दीड
महिन्यापूर्वी ऑस्ट्रेलियात या विषाणूची लागण क्रूझवरील देशाबाहेरील लोकांमार्फत झाली.
मात्र, लागलीच सरकारने याबाबत गांभीर्याने पावले उचलली. दक्षिण ऑस्ट्रेलियात 470 लोकांना
लागण झाली व सहाजणांचा मृत्यू झाला. आता लागण होणाऱयांची संख्या रोज कमी होत आहे, असे
सौ. सामंत सांगतात. संपूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये सुमारे पाच हजार लोकांना लागण झाली असून
मृतांची संख्या पन्नास आहे. आता मात्र यावर सरकारने पूर्ण नियंत्रण मिळविले आहे.

परदेशातून आलेल्यांचे शंभर टक्के क्वॉरंटाईन

परदेशातून
ऑस्ट्रेलियात आलेल्या शंभर टक्के लोकांचे सरकारने क्वॉरंटाईन केले आहे. शासनाने यात
गांभीर्याने लक्ष घातले असून कोणालाही सूट दिली जात नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियात
जनतेमध्ये सुरक्षित भावना निर्माण झाल्याचे 
सामंत म्हणाल्या.

लोक जमण्याची ठिकाणे बंद, लॉकडाऊन नाही

ज्या-ज्या
ठिकाणी लोक एकत्रित येत होते, अशी सर्व ठिकाणे सरकारने बंद केली आहेत. तसेच दोनपेक्षा
जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास कडक निर्बंध घातले आहे, असे श्रेया यांनी सांगितले.
दक्षिण ऑस्ट्रेलियात कुठेही लॉकडाऊन करण्यात आले नाही. मात्र, कडक शिस्तीमुळे व शिस्त
मोडल्यामुळे होणारा दंड मोठा असल्याने प्रत्येक नागरिक नियमाचे काटेकारपणे पालन करतो.
त्यामुळे सहजासहजी रस्त्यावर कोणी दिसत नाही, असे त्या म्हणाल्या.

घरासमोर क्रिकेट खेळणाऱयांना प्रत्येकी 80 हजाराचा दंड

हल्लीच
पाच तरुण त्यांच्या घरासमोरच्या अंगणात क्रिकेट खेळण्यासाठी एकत्र आले आणि त्याचवेळी
पोलीस आले. त्या तरुणांवर कारवाई करत प्रत्येकी 1651 डॉलर (भारतीय चलनानुसार 80 हजार
रु.) एवढा दंड करण्यात आला. त्यामुळे पोलिसांचे दोन-चार दांडे चालतील. पण दंड नको,
असे येथे म्हणण्याची वेळ येते, असे सामंत यांनी सांगून असा मेसेज देशभर गेल्यावर आपोआपच
लॉकडाऊन होते आणि साथीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाल्याचे स्पष्ट केले.

बार-हॉटेल, पार्सल सेवाही सुरू

ऑस्ट्रेलियातील
हॉटेल-बार सुरू आहेत. ते बंद नाहीत. मात्र, तुम्हाला जे हवे ते पार्सल घेऊन घरी जायचे
आहे. दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकावेळी फिरू शकत नाही. इतर दुकानातही एकावेळी दोन व्यक्तींनाच
प्रवेश दिला जातो. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव चांगल्या पद्धतीने नियंत्रणात आणण्यात
यश मिळाले आहे, असे  त्यांनी सांगितले.

शाळा बंद नाहीत, पैसे शासन भरणार

ऑस्ट्रेलियात
शाळांना सुट्टी देण्यात आलेली नाही. सध्या नियमित सुट्टी शाळांना आहे. शाळा सुरू झाल्यावर
शाळेत जावेच, अशी सक्ती नाही. मात्र, ज्यांना नोकरी व शासकीय सेवेनिमित्त बाहेर जावे
लागणार व मुलांना शाळेत पाठवावे लागणार, त्यांची फी शासन भरणार आहे. मात्र, जे शाळेत
जाणार नाहीत. त्यांना शिक्षक शाळेतून ऑनलाईन शिकविणार असून ऑनलाईन त्यांनी ते पाहून
शिकायचे आहे.  90 ते 95 टक्के मुलांच्या घरी
अशी सोय आहे. मात्र, ज्यांच्याकडे सोय नाही. त्यांना कॉम्प्युटर व इंटरनेट सेवा शासन
पुरविणार आहे, असे सामंत म्हणाल्या. ऑस्ट्रेलियातील उद्योग सुरू आहेत. मात्र, उद्योग-व्यवसायात
मंदी असल्याचे त्या म्हणाल्या.

भारताचे ऑस्ट्रेलियातही होते कौतुक

भारताची
लोकसंख्या खूप असून तुलनेत दंडात्मक कारवाई होत नसल्याने फारशी शिस्त नाही. असे असताना
भारताने लॉकडाऊनच्या माध्यमातून कोरोनाविरुद्ध चांगल्या लढा दिला. इतर देशांच्या मानाने
चांगले नियंत्रण ठेवले, असा गौरव ऑस्ट्रेलियात ऐकायला मिळतो आणि त्याचा आनंद आम्हाला
साहजिकच होतो, असे त्या म्हणतात. भारतीयांनी अजूनही गर्दी कमी करून पूर्ण नियंत्रण
मिळवून आपला देश कोरोनामुक्त करावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

तरुणांनी कोरोनाचे वाहक बनू नये : संयम पाळावा

कोरोनाची
लागण तरुण पिढीला जास्त होत नाही आणि झाली तरी ते समजून येत नाही. कारण त्यांची प्रतिकारशक्ती
चांगली असते. मात्र, पन्नाशीनंतरच्या किंवा मधुमेह, रक्तदाब यांचा त्रास आहे, अशा व्यक्तींना
त्याचा त्रास होतो. घरातील वृद्ध घरातच असतात. मात्र, तरुण आपल्यापासून इतरांना त्रास
होणार नाही, याची काळजी घेताना दिसत नाहीत. तरुणांमध्ये कोरोनाची लागण झाली, तर ते
वाहक बनतात व घरातील ज्येष्ठांपर्यंत हा प्रादुर्भाव नेतात. याबाबत काळजी, तीही गांभीर्याने
घेणे गरजेचे आहे, असे सामंत म्हणाल्या. भारतीय तरुणांनी याची जाणीव ठेवून आता गर्दीत
जाऊ नये. सामाजिक अंतर ठेवावे. जेणेकरून आपण आपल्या घरातील ज्येष्ठांपर्यंत कोरोना
नेणार नाही. याची काळजी घ्यावी, असा संदेश त्यांनी दिला आहे.

सामंत
कुटुंबियांचे डिसेंबर 2018 ते जानेवारी 2019 असे दोन महिने वेताळबांबर्डेसह सिंधुदुर्गात
येणे होते. यावर्षीही ते येणार होते. त्यांचा मुलगा बारावीला असल्याने परीक्षाही उशिरा
होणार असल्याने त्यांचे यावर्षीचे येणे उशिरा असेल. विराज सध्या घरातच बसून संगणकावर
बारावीचा अभ्यास करत आहे. कोरोनामुळे देशांतर्गत विमानसेवा बंद आहेत. तसेच इतर अडचणींमुळे
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारतात येण्याची आतुरताही वाढल्याचे त्या म्हणाल्या.

सिंधुदुर्ग
जिल्हय़ातील आरोग्य, पोलीस व जिल्हा प्रशासनाने चांगले काम केले आहे व अजूनही चांगले
काम करीत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही. साहजिकच सिंधुदुर्गवासीयांचे आरोग्य
चांगले ठेवण्यात फार मोठे योगदान या सर्व यंत्रणांनी दिल्याने त्यांना सामंत यांनी
धन्यवाद दिले.

खरंतर
9 एप्रिल 2020 रोजी सामंत हे वेताळबांबर्डे-कुडाळ येथे असणार होते. त्यांच्या भावाचे
लग्न कुडाळ येथे होते. मात्र, कोरोनामुळे ते पुढे ढकलण्यात आले. अर्थात विमानसेवा बंद
असल्याने व एकूणच परिस्थितीमुळे सामंत यांनी आपले येणे रद्द केले.

‘तरुण भारत’च्या ‘ई’ आवृत्तीचे कौतुक

‘तरुण
भारत’च्या ‘ई’ आवृत्तीच्या माध्यमातून सिंधुदुर्गसह महाराष्ट्राची माहिती मिळते, असे
सौ. सामंत म्हणाल्या. सिंधुदुर्गवासीयांनी विशेषत: तरुणांनी गांभीर्याने शासनाचे नियम
पाळावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.