ऑस्ट्रेलियाच्या डावात लाबुशेनचे नाबाद दीडशतक
वृत्तसंस्था/ पर्थ
विंडीज विरुद्धच्या येथे बुधवारपासून सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर यजमान ऑस्ट्रेलियाने 90 षटकात 2 बाद 293 धावा जमविल्या. मार्नस लाबुशेनने दमदार नाबाद दीड शतक (154) झळकवले. स्टीव्ह स्मिथ 59 धावांवर खेळत आहे.
या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावातील चौथ्या षटकातच विंडीजच्या सिलेसने सलामीच्या वॉर्नरचा 5 धावांवर त्रिफळा उडविला. त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि लाबुशेन या जोडीने संघाचा डाव सावरताना दुसऱया गडय़ासाठी 142 धावांची भागीदारी केली. उस्मान ख्वाजाने 149 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 65 धावा झळकविल्या. ख्वाजा बाद झाल्यानंतर लाबुशेनला स्टीव्ह स्मिथकडून चांगली साथ मिळाली. या जोडीने तिसऱया गडय़ासाठी अभेद्य 142 धावांची भागीदारी केली आहे. ऑस्ट्रेलियाची ही जोडी फोडण्यासाठी विंडीजच्या कर्णधाराने सहा गोलंदाजांचा वापर केला. पण त्याला यश मिळू शकले नाही. तत्पूर्वी मेयर्सने ख्वाजाला डिसिल्वाकडे झेल देण्यास भाग पाडले होते. उपाहारावेळी ऑस्ट्रेलियाची स्थिती 1 बाद 72 अशी होती. लाबुशेनचे हे कसोटीतील आठवे शतक आहे. लाबुशेन 270 चेंडूत 1 षटकार आणि 16 चौकारांसह 154 धावांवर तर स्मिथ 107 चेंडूत 7 चौकारांसह 59 धावांवर खेळत आहे. विंडीजतर्फे सिलेस आणि मेयर्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. उभय संघांमध्ये दोन सामन्यांची ही कसोटी मालिका खेळविली जात असून या मालिकेतील दुसरा सामना ऍडलेड येथे 8 डिसेंबरपासून सुरू होईल.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया प. डाव- 90 षटकात 2 बाद 293 (लाबुशेन खेळत आहे 154, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे 59, उस्मान ख्वाजा 65, वॉर्नर 5, सिलेस 1-63, मेयर्स 1-24).