‘एलआयसी’चा आयपीओ सौदी अरामकोसारखा दर्जेदार?
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एलआयसीमध्ये हिस्सेदारी विक्री करण्याच्या प्रस्तावामुळे याच्या आयपीओची तुलना सौदी अरबची दिग्गज तेल कंपनी सौदी अरामकोबरोबर होणार आहे. पैसे जमा करण्यामध्ये एलआयसीचा आयपीओ सौदी अरामकोच्या आयपीओसारखा असल्याचे बाजारातील विश्लेषकांकडून सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सौदी अरामकोने आपल्या आयपीओने 1.82 लाख कोटींची रक्कम जमा केली होती. तर एलआयसीच्या आयपीओद्वारे सरकार 50 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम प्राप्त करू शकते, जो भारतीय कंपन्यांसाठी एक विक्रम असेल.
केंद्र सरकारने विमा क्षेत्रातील सर्वात दिग्गज कंपनी लाईफ इन्शोरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) मध्ये हिस्सेदारी विक्री करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी लवकरच आयपीओची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आयपीओनंतर एलआयसी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला (आरआयएल) मागे टाकत देशातील सर्वात मोठी सूचीबद्ध कंपनी होईल आणि याचे बाजार भांडवल 8 ते 10 लाख कोटी रुपयांच्या दरम्यान असेल.
50 हजार कोटी मिळणार?
एलआयसीचे मूल्यांकन जवळपास 10 लाख कोटी रुपये केले तर यात 5 टक्के हिस्सेदारीच्या विक्रीतून सरकारला 50 हजार कोटी रुपयांचा निधी प्राप्त होऊ शकतो. यातून वित्तीय तूट दूर करण्यास मदतही मिळेल, असे सेमको सिक्युरिटीजचे सीईओ जीमित मोदी यांनी ब्लूमबर्ग अहवालात म्हटले आहे.